औरंगाबाद10 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
मराठा आंदोलन सुरु असल्यामुळे शुक्रवारी रात्रीपासून बससेवा पूर्णत: ठप्प झाली आहे. शनिवारी व रविवारी असे दोन दिवसांत सुमारे 1 कोटी 10 लाखांचे उत्पन्न बुडाले. तसेच दोन लाख प्रवाशांचे हाल झाले आहेत. दीड ते तीनपट जास्तीचे भाडे देऊन खासगी वाहनातून त्यांना प्रवास करावा लागला.

जालना जिल्ह्यातील अंतरवाल सराटी गावात शुक्रवारी मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. यामुळे राज्यभर त्याचे विविध माध्यमातून तीव्र पडसाद उमटत आहे. रस्ता रोको, वाहन पेटून, टायर जाळून आंदोलन होत आहेत. बीड रोडवर चार बस, मध्यवर्ती मध्ये एक अशा एकूण पाच बस पेटवण्यात आल्या होत्या. त्यामुळे एसटी महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वातावरण संतप्त आहे. अधिकचे नुकसान नको म्हणून एसटी प्रशासनाने शक्रवारी रात्रीपासून बससेवा बंद केली आहे. यामुळे हजारो प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. उद्या शहर जिल्हा बंद पुकारण्यात आला आहे. त्यामुळे उद्याही दिवसभर बससेवा बंदच राहणार आहे.
सवलती धारकांची परवड
सिडको बसस्थानकात सकाळच्या सत्रात तीन हजाराहून अधिक प्रवासी प्रवास करण्यासाठी आले होते. यात मोफत व ५० टक्के सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या महिला व ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची सर्वाधिक संख्या होती. मात्र, बससेवा ठप्प राहिल्याने त्यांना दीड ते दुप्पट भाडे भरून प्रवास करावा लागला.
विद्यार्थ्यांची शाळा बुडली
बससेवा बंद असल्याने पासधारक विद्यार्थ्यांना शनिवारी शाळा, महाविद्यालयात दांडी मारावी लागली. तर उद्या देखील शहर व जिल्हा बंदची हाक मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारी त्यांची गैरसोय होणार आहे.
