अमरावतीएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
पैसा भरपूर आहे, पण आरोग्य साथ देत नाही. मग निरामय जीवन जगणार कसे, या प्रश्नाचे उत्तर ‘फिटनेस’ मध्ये आहे, असे सांगून अमरावती मॅरेथॉन असोसीएशनने यावर्षीही अमरावती हाफ मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी १८०० धावकांनी नोंदणी केली असून स्पर्धा आयोजनाचा दिवस उजाडेपर्यंत ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली असेल, असे अमरावती मॅरेथॉन असोसीएशनचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी आज, रविवारी येथे स्पष्ट केले.
जीएसटी विभागाचे निवृत्त उपायुक्त असलेले दिलीप पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, आरोग्य जपण्यासाठीची धडपड प्रत्येकालाच करावी लागते. त्यामध्ये सायकल चालवणे हा एकट्याने व सहज करता येण्याजोगा व्यायाम आहे. सायकल चालविल्याने शरीरातील बहुतेक सर्व अवयवांचा व्यायाम होतो. त्यामुळे आरोग्य चांगले राहते शिवाय रोजच्या कामकाजातील ताजेपणाही कायम राहतो. त्यासाठीच गेल्या तीन वर्षांपासून अमरावतीत हाफ मॅरेथॉन स्पर्धा घेतली जात आहे.
२१ किलोमीटर लांबीची (हाफ मॅरेथॉन) ही स्पर्धा पुढच्या महिन्यात ८ तारखेला होणार असली तरी स्पर्धक म्हणून सहभागी होण्यासाठी किमान तीन महिने आधी तयारी सुरु करावी लागते. त्यामुळे इच्छूकांनी आतापासून तयारीला लागावे, असेही यावेळी सांगण्यात आले. स्पर्धेत दोन वयोगट ठेवण्यात आले आहे. त्यामध्ये प्रौढांसाठी २१ किमी, १० किमी व ५ किमी अशी तीन प्रकारची मॅरेथॉन होईल तर लहान मुलांसाठी फक्त पाच किलोमीटरची मॅरेथॉन ठेवण्यात आली आहे. यापैकी हाफ मॅरेथॉन व लहान मुलांच्या गटातील प्रथम पाच पुरुष व पाच महिला तर प्रौढांसाठीच्या १० व पाच किलोमीटरच्या गटातील प्रथम तीन पुरुष व महिला विजेत्यांना पुरस्कार दिले जातील. अशाप्रकारे सर्व विजेत्यांना साडे तीन लाख रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत.
पत्रकार परिषदेला अध्यक्ष दिलीप पाटील यांच्यासह संस्थेचे सचिव अतुल पाटील, कोषाध्यक्ष किशोर वाठ, सदस्य तथा जिल्हा पोलिस उपअधीक्षक सूर्यकांत जगदाळे, नागपुरी गेटचे ठाणेदार अनिल कुरळकर, श्रीनिवास उदापुरे, महेश वाघ, सुनील बोदडे, राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.