आवक: मुळा धरणात कोतूळकडून 2,247 क्युसेकने आवक; धरण 75 टक्के भरले

अहमदनगर9 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

26 हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमतेच्या मुळा धरणाचा सोमवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंतचा पाणीसाठा 19 हजार 483 दशलक्ष घनफूट झाल्याने धरण 75 टक्के भरले आहे. सोमवारी सायंकाळी 6 वाजता कोतूळकडून मुळा धरणात 2 हजार 247 क्युसेकने नवीन पाण्याची आवक सुरू होती.

जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून हरिश्चंद्रगडावर सुरू असलेल्या पावसामुळे कोतूळकडून मुळा धरणात नवीन पाण्याची समाधानकारक आवक सुरू आहे. जून महिन्यात मुळा धरणातील पाणीसाठ्याची ८ हजार ६०३ दशलक्ष घनफूट नोंद होती. जुलै ते ७ ऑगस्ट या कालावधीत कोतूळकडून मुळा धरणात 10 हजार 880 दशलक्ष घनफूट नवीन पाणी दाखल झाल्याने सोमवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुळा धरणाचा पाणीसाठा 19 हजार 483 दशलक्ष घनफुटावर जावून पोहोचला.

मागील वर्षी आजच्या दिवशी मुळा धरणाच्या पाणीसाठ्याची 20 हजार 277 दशलक्ष घनफूट नोंद असल्याने धरण 78 टक्के भरले होते. 8 जूनला सुरू झालेल्या मृग नक्षत्राचा पंधरवाडा कोरडा गेल्याने आद्रा नक्षत्रात लाभक्षेत्रात पाऊस पडेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा व्यर्थ ठरली. यापाठोपाठ पुनर्वसू व पुष्य नक्षत्रात देखील समाधानकारक पाऊस झालेला नाही.

3 ऑगस्टपासून आश्लेषा नक्षत्र सुरू असल्याने पावसाच्या आगमनाची शेतकरी चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत आहेत. मुळा धरणाच्या स्थापनेपासून ऑगस्ट महिन्यात ७५ टक्के धरण भरण्याची यंदाची 41 वी वेळ आहे. ७ ऑगस्टला सायंकाळपर्यंत मुळा धरणाची पाणीपातळी 1799.70 पर्यंत जाऊन पोहोचली. मागील वर्षी आजच्या दिवशी धरणाच्या पाणीपातळीची 1801.40 नोंद होती.

कोतुळकडून 10,880 दलघफू धरणात दाखल

8 जून ते 7 ऑगस्ट 2023 पर्यंत कोतूळ 227 मिलिमीटर, मुळानगर 262 मिलिमीटर, वांबोरी 100 मिलिमीटर, राहुरी 193 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी 7 ऑगस्टपर्यंत कोतूळ 432 मिलिमीटर, तर मुळानगर 322 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. मुळा धरणाचा जून महिन्यापर्यंतचा पाणीसाठा 8 हजार 603 दशलक्ष घनफूट (33 टक्के) होता. 7 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत धरणाचा पाणीसाठा 19 हजार 483 दशलक्ष घनफूट झाल्याने धरण 75 टक्के भरले. गेल्या महिन्याभरात कोतूळकडून मुळा धरणात 10 हजार 880 दशलक्ष घनफूट नवीन पाणी दाखल झाले.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *