मुंबईत प्रदूषणाची भयानक स्थिती; 461 बांधकामांना नियम पाळण्याची नोटीस

Mumbai Air Pollution: मुंबई महानगरात वायू प्रदूषण नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी होते आहे किंवा कसे, याची पाहणी करण्यासाठी सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये मिळून काल (दिनांक ३ नोव्हेंबर २०२३) ८१५ बांधकामांच्या ठिकाणी पथकांनी भेटी दिल्या आहेत. त्यामध्ये नियमांचे एकूण ४६१ बांधकामांना लेखी सूचना (inatimation) देण्यात आली आहे. एवढेच नव्‍हे तर लवकरात लवकर नियमांचे अनुपालन केले नाही तर काम थांबवण्याची नोटीस जारी करणे किंवा कामाचे ठिकाण सील करणे, यासारखी कठोर कारवाई करण्‍याचा सक्त इशारा देखील बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

वातावरणातील बदलामुळे मुंबई महानगरासह मुंबई प्रदेशातील हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होत आहे. त्याची दखल घेत, मुंबई महानगरातील वायू प्रदूषण व त्यातही प्रामुख्याने धूळ नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने प्रभावी पावले उचलावीत, अशी सूचना महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिका प्रशासनाला केली होती. त्यानुसार महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्‍या निर्देशानुसार आणि  अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी,अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्‍या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्‍या सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये युद्ध पातळीवर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. 

तसेच, मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी सर्व संबंधित घटकांनी देखील प्रयत्न करणे आवश्यक असल्याने त्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिनांक २५ ऑक्टोबर २०२३ रोजी मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहेत. या नियमांचे पालन होते आहे, यावर देखरेख करण्यासाठी सर्व २४ प्रशासकीय विभागांच्या सहायक आयुक्तांनी पथके नेमली आहेत. या पथकामध्‍ये दोन (वॉर्ड) अभियंता, एक पोलिस, एक मार्शल, वाहन यांच्‍यासह विभाग कार्यालयातील एका वरिष्ठ अधिका-याचा समावेश आहे. लहान विभागाात दोन पथके, मध्यम विभागाात चार पथके तर, मोठ्या विभागाात सहा पथके गठित करण्‍यात आली आहेत. ही पथके संबंधित परिसराला भेट देऊन कामाच्या ठिकाणाची पाहणी करत आहेत. तसेच, कामाच्या ठिकाणी मार्गदर्शक तत्‍त्‍वांचे पालन दिलेल्या मुदतीत करावे म्हणून लेखी सूचना (intimation) देखील दिली जात आहे.

Related News

मुंबईतील सर्व २४ विभागांमधील पथकांनी आपापल्या कार्यक्षेत्रात काल (दिनांक ३ नोव्हेंबर २०२३) एकाच दिवसात दिलेल्या भेटींचा एकत्रित विचार करता मुंबईतील ८१५ बांधकाम प्रकल्‍प स्‍थळांना प्रत्‍यक्ष भेटी देण्यात आल्या. तसेच, मार्गदर्शक तत्वांचे अनुपालन दिलेल्या मुदतीत करावे, यासाठी ४६१ बांधकाम प्रकल्‍पांना लेखी सूचना बजावण्यात आल्‍या आहेत. उर्वरित बांधकाम प्रकल्‍प स्‍थळांनाही भेटी देण्‍याचे वेळापत्रक निश्चित करण्‍यात आले आहे.

तसेच, महानगरपालिकेचे संबंधित इतर विभाग देखील ऑटो डीसीआर सारख्या ऑनलाईन प्रणालीतून बांधकाम प्रकल्पांना लेखी सूचना देत आहेत. 

सर्व संबंधित घटक आणि यंत्रणांसाठी देखील ही मार्गदर्शक तत्वे अनिवार्य आहेत. महानगरपालिकेने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांची तातडीने आणि दिलेल्या वेळेत अंमलबजावणी करावी अन्‍यथा बांधकाम थांबवण्याची नोटीस जारी करणे किंवा कामाचे ठिकाण सील करणे, यासारखी कठोर कारवाई करण्‍यात येईल, असा सक्त इशारा महानगरपालिका आयुक्‍त इकबाल सिंह चहल यांनी पुन्हा एकवार दिला आहे.Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *