नांदेड – रिक्षा अपघातात ८ भाविक जखमी, रेणुकादेवी घाटातील घटना | महातंत्र
श्रीक्षेत्र माहूर – महातंत्र वृत्तसेवा – परिक्रमा यात्रेच्या नियोजन बैठकीत ३० आणि ३१ ऑगस्ट रोजी गडावर जाणाऱ्या खासगी प्रवासी वाहतूक पूर्णतः बंद करण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतु ३१ ऑगस्टला दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान भाविकांची प्रचंड गर्दी असतानाही खासगी वाहतुकीस परवानगी दिली गेली. वाहतुकीच्या गोंधळात अवैध प्रवासी वाहतूक करणारा तीनचाकी अॅपे एम. एच. २६ टी ९८५७ या क्रमांकाची रिक्षा रेणुकादेवी घाटात उतरत असताना पलटी झाली. या अपघातात ८ भाविक जखमी झाले.

ही घटना दि. ३१ऑगस्ट रोजी दुपारी दिड वाजण्याच्या दरम्यान घडली. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्याला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियोजन बैठकीत ३१ ऑगस्ट रोजी पूर्ण दिवसभर खासगी प्रवासी वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्याचे ठरले होते.

गोदावरी कैलास किरडे (वय ३५), मनीषा मारुती किरडे (वय ३५), जनाबाई विठ्ठलराव चव्हाण (वय ४०), राणी त्र्यंबक किरडे ( वय ३०), अरुणा त्र्यंबक किरडे (वय ३५) राहणार चाटोरी आणि चोरवड ता. पालम जि. परभणी, पुष्पा विजय आकरते (वय ५४), प्रणाली नितीन आकरते (वय २९) आणि विजय सारंगधर आकरते (वय ६६) राहणार अकोला अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय माहूर येथे प्राथमिक उपचार सुरु आहेत. वरील पैकी गोदावरी, जनाबाई व अरुणा यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलविले आहे. अपघातग्रस्त ॲपे ही रिक्षा शेख सलमान शेख मुनाफ रा. माहूर यांच्या मालकीची असून मारुती शंकर जोगदंड हे चालक आहेत.

यात्रा व्यवस्थापन प्रमुख या नात्याने मला कुठलीही पूर्व कल्पना न देताच खासगी प्रवासी वाहतूक सुरु करण्यात आली, अशी माहिती तहसीलदार डॉ. राजकुमार राठोड यांनी दिली. खासगी प्रवासी वाहतूक सुरु करण्याची परवानगी मी दिली असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डी. एस. शिनगारे यांनी सांगितले.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *