अजिंठा नागरी बँकेच्या ९५ टक्के ठेवीदारांना परत मिळणार पैसे: बँकेतील ५ लाख रुपयांपेक्षा कमी गुंतवणुकीला विम्याचे संरक्षण

छत्रपती संभाजीनगर20 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक
  • ‘आम्ही विश्वासाने बचत केली ती परत मिळावी,’ असे म्हणत महिला ठेवीदाराने बँकेत फोडला टाहो

अजिंठा नागरी सहकारी बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातल्यानंतर ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. ४० हजारांपैकी ९५ टक्के ठेवीदारांनी ५ लाख रुपयांपेक्षा कमी रुपये बँकेत ठेव स्वरूपात ठेवले आहेत. ५ लाखांपर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण असल्यामुळे या ठेवीदारांना पैसे मिळतील. उर्वरित ५ टक्के ठेवीदारांच्या ठेवी ५ लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याने त्यांना पैशांसाठी प्रतीक्षा करावी लागेल.

Related News

‘आरबीआय’ने निर्बंध घातल्यानंतर बुधवारी सकाळपासून ग्राहकांनी अजिंठा नागरी सहकारी बँकेत ठेवींबाबत चौकशी करण्यास सुरुवात केली. एका महिला ठेवीदाराने, ‘आम्ही विश्वासाने बचत केली ती परत मिळावी,’ असे म्हणत टाहो फोडला होता. दुसरा एका ग्राहकाने अंगावर रॉकेल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. दिवसभरात चार हजारांहून अधिक ग्राहकांनी बँकेत येऊन ठेवीबाबत चौकशी केली. सर्वांच्या चेहऱ्यावर तणाव व भीती स्पष्टपणे दिसून येत होती. अधिकारी व कर्मचारीही भांबावलेल्या चेहऱ्याने ग्राहकांची समजूत काढताना दिसून आले.

खातेदार, ठेवीदारांच्या भावना : ‘माजी आमदारांच्या बँकेवर निर्बंध येतील, असं कधी वाटलंच नव्हतं’

कष्टाचे पैसे मिळावेत
मेस चालवून आम्ही दोन पैसे कमावतो. पत्नीच्या नावे १.३६ लाखांची ‘एफडी’ आहे. आठ दिवसांपूर्वीच माझ्या खात्यात ५१ हजार रुपये भरले होते. कष्टाचे पैसे आम्हाला परत मिळावेत.

– रवींद्र देशमुख, खातेदार.

कठोर कारवाई व्हावी
माझे ‘अजिंठा नागरी’मध्ये २५ हजार, तर मलकापूर बँकेत सुमारे ५ लाख रुपये अडकले आहेत. भ्रष्ट, गैरव्यवहार करणाऱ्यांवर नियमाप्रमाणे कठोर कारवाई झाली पाहिजे.

– हरीश पवार, ठेवीदार

दीड लाख रुपये अडकले
मी मंदिराजवळ फूल, हार, नारळ विक्रीचा व्यवसाय करतो. यातून दररोज बचत करत होतो. सुमारे दीड लाख रुपये बँकेत ठेवले आहेत. माझे हे अडकलेले पैसे परत मिळावेत.

– दिलीप काथार, खातेदार.

निर्बंधांमुळे मन सुन्न

अजिंठा बँकेवर निर्बंध आल्याचे कळताच मन सुन्न झाले होते. काटकसर करून आम्ही बचत केली व ते पैसे बँकेत ठेवले आहेत. आम्हाला आमचे पैसे परत मिळावेत.

– संध्या मकरिये, खातेदार.

शहरातील पाचव्या वित्तसंस्थेवर ‘आरबीआय’चे निर्बंध

मलकापूर अर्बन बँक, आदर्श नागरी सहकारी बँक, देवाई नागरी सहकारी पतसंस्था, यशस्विनी सहकारी पतसंस्था यांच्यापाठोपाठ आता अजिंठा नागरी सहकारी बँकेवर आरबीआयने निर्बंध घातल्याने शहरातील हजारो ठेवीदार हवालदिल झाले आहेत. नागरी सहकारी बँकांवरील विश्वासाला तडा गेला आहे. त्याबरोबरच सहकार विभाग, सीए आदींच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

जिल्हा उपनिबंधक व्यस्त

जिल्हा उपनिबंधक डॉ. मुकेश बारहाते यांना अजिंठा नागरी सहकारी बँकेतील एकूण ठेवीदार किती, त्यांची ठेवी किती, आदींबाबत विचारणा केली होती. झांबड यांनी दिलेली माहिती बरोबर आहे का, याची विचारणाही केली, मात्र, “मी व्यस्त आहे, नंतर सांगतो,’ असे ते म्हणाले.

पैसे बुडण्याच्या भीतीने काही ठेवीदार नाव सांगत नव्हते
दिवसभरात चार हजारांहून अधिक ठेवीदार ठेवीबाबत विचारणा करण्यासाठी जुना मोंढा व उस्मानपुरा शाखेत आले होते. आमदारांच्या बँकेत असं कसं होऊ शकतं, असा त्यांचा सूर होता. पण, बँकेची बदनामी झाल्यास पैसे परत मिळणार नाहीत, या चिंतेने नाव सांगण्यास कुणी तयार नव्हते.

दिव्य मराठी थेट सवाल – सुभाष झांबड, अध्यक्ष, अजिंठा नागरी सहकारी बँक

दिव्य मराठी : अजिंठा नागरी सहकारी बँकेत एकूण किती ठेवीदार आहेत?
झांबड :
बँकेचे सुमारे ४० हजार ठेवीदार आहेत.
दिव्य मराठी : बँकेत एकूण ठेवी किती आहेत?
झांबड :
ठेवीदारांनी ४०० कोटींच्या ठेवी ठेवलेल्या आहेत.
दिव्य मराठी : बँकेने किती कर्ज वाटप केले आहे?
झांबड :
३०० कोटींचे कर्ज वितरण केलेले आहे.
दिव्य मराठी : बँकेचा एनपीए किती आहे?
झांबड :
बँकेचा एनपीए ४.३० % आहे.
दिव्य मराठी : ५ लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक असलेले ठेवीदार किती आहेत?
झांबड :
एकूण ४० हजारांपैकी ५ टक्के ग्राहकांच्या ठेवी ५ लाखांपेक्षा जास्त आहेत.
दिव्य मराठी : ग्राहकांना त्यांच्या ठेवी परत मिळतील का?
झांबड :
होय. सर्व ग्राहकांच्या ठेवी परत करण्याची जबाबदारी माझी असून ती प्रामाणिकपणे पूर्ण करणार आहे.

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *