पुणे12 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मिरेकर वस्ती येथे एका 17 वर्षीय मुलाचा कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. स्वप्नील विठ्ठल झोंबर्डे ( वय- 17 वर्षे ) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी 6 आरोपीवर हडपसर पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मयत मुलाचे वडील विठ्ठल महादेव झोंबार्डे (वय- 46 वर्षे ) यांनी आरोपी विरोधात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार सनी रावसाहेब कांबळे (वय -25), अमन साजिद शेख (22), आकाश हनुमंत कांबळे (वय -23) यांच्यासह 16 वर्षाचे दोन आणि 17 वर्षांच्या एका आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
‘पंगा घेतला तर असाच मुडदा पाडू’
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा मुलगा स्वप्नील झोंबर्डे यास यातील आरोपी यांनी संगनमत करून पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून त्यांच्याकडील धारदार लोखंडी हत्यारांनी स्वप्नील याच्या डोक्यावर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने वार करून जीवे ठार मारले. तसेच सनी कांबळे व अमन शेख यांनी त्यांच्याकडील धारदार लोखंडी हत्यारे हवेत फिरवून ‘आमच्या सोबत कोणी पंगा घेतला तर ,असाच एका एकाचा मुडदा पाडू ‘असे बोलून संबधित परिसरात दहशत पसरवली आहे.
हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
याप्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपीवर कलम – 302,326, 143, 147,148, 149, 341 भादविस 4(25) आर्म्स ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती मिळताच, पोलीस उपायुक्त परिमंडळ -5 विक्रम देशमुख, सहा.पोलीस आयुक्त अश्विनी राख हडपसर विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके हडपसर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विश्वास डगळे, सहायक पोलिस निरीक्षक विजयकुमार शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती पाहणी केली. याबाबत पुढील तपास हडपसर पोलिस स्टेशनचे सहा पोलीस निरीक्षक प्रमोद दोरकर करत आहे.