एका चिठ्ठीने घात केला! प्रेमप्रकरणाच्या संशयातून २२ वर्षाय तरुणाची निर्घृण हत्या, मुलीच्या वडिलांनी…

विशाल करोळे, झी मीडिया

Chhatrapati Sambhaji Nagar News: संभाजीनगरहून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुलीसोबतच्या प्रेमप्रकरणातून 22 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली आहे. नारायण रतन पवार असे मयत तरुणाचे नाव असून कन्नड तालुक्यातील खातखेडामध्ये ही घटना घडली आहे. 

मुलीसोबत प्रेमप्रकरण असल्याच्या संशयातून तिच्या घरच्यांनी नारायण याचा बेदम मारहाण करुन त्याचा त्याला विहिरीत फेकून दिले. त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीसह 18 नातेवाईकांविरोधात पिशोर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related News

कन्नड तालुक्यातील खातखेडा येथील नारायण रतन पवार हा तरुण रविवारी रोजी सायंकाळी सुमारास घरासमोर बाहेर बसला होता. यावेळी एका सात वर्षीय चिमुकल्याने एक चिठ्ठी आणून नारायण याच्या दरवाजात टाकली. आई, वडील व बहीण त्यावेळी तिथेच बसलेले होते. त्यामुळं नारायण याने घरच्यांना ही चिठ्ठी दाखविली. सदरील चिठ्ठी ही घरासमोर राहणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीने पाठविली असून, त्यात मला तुझी खूप आठवण येते. तू तुझ्या परिवारावर प्रेम करतो की माझ्यावर? माझ्यावर प्रेम असेल तर मला दूर घेऊन चल, अशा प्रकारचा इतर मजकूर लिहिलेला होता. चिठ्ठी सापडल्याने नारायण आणि त्याचा परिवार चिंतेत होता.

नारायण पवार याचे वडील रतन पवार, आई मीराबाई यांनी सोमवारी सकाळी चिठ्ठी मुलीच्या आई-वडिलांना दाखविली. मुलीला समोर बोलावून विचारले असता मी चिठ्ठी लिहिली नाही, असे मुलीने सांगितले. यावरून मुलीचे वडील राजेंद्र काकुळते यांनी नारायण पवार याला लाकडी दांड्याने मारहाण केली. यावेळी सर्वांनी समजावून भांडण मिटवून घेतले. मात्र रात्री पुन्हा सर्व पवार कुटुंबीय घरी बसलेले असताना दरवाजा वाजला म्हणून नारायण पवार याने दरवाजा उघडला. दरवाजात उभा असलेल्या प्रवीण नारायण काकुळते याने नारायण यास बाहेर ओढले. बाहेर उभ्या असलेल्या 17 ते 18 जणांनी काठ्या आणि दगड घेऊन नारायणला जबर मारहाण केली. 

मुलाचे वडील वाद सोडविण्यासाठी गेले असता त्यांनाही मारहाण केली. मारहाणीदरम्यान 4 आरोपींनी नारायण यास उचलून नदी पात्रातील विहिरीमध्ये फेकून दिले. परत घरी येऊन तरुणाच्या आई, वडील, बहीण व भाऊ कैलास यांना मारहाण करून धमकी देऊन निघून गेले. पोहता येत नसल्याने तरुण नारायण हा विहिरीत बुडाला. त्याला ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी विहिरीबाहेर काढले. मात्र, त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी उशिरा शवविच्छेदन करून तरुण नारायण रतन पवार याच्यावर पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *