file photo
चंद्रपूर; महातंत्र वृत्तसेवा : चंद्रपूर शहरालगतच्या जूनोना जांगलातील शनी मंदिरात आज (दि. २०) सकाळी पूजा करायला गेलेल्या एका 53 वर्षीय इसमाचा वाघाच्या हल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली. मनोहर वाणी असे मृत्तकाचे नाव आहे. या घटनेने बाबूपेठ परीसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
चंद्रपूर येथील मनोहर वाणी हे आज (दि. २०) सकाळी बाबूपेठ भागातील जुनोना जंगलातील शनी मंदिरात पूजा करण्यासाठी गेले होते. मंदिर परिसरात पट्टेदार वाघ दबा धरून बसला होता. दरम्यान वाणी पूजेसाठी मंदिरात प्रवेश करीत असताना वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ठार केले. त्यानंतर मृतदेह 300 ते 400 मीटर अंतरावर ओढत नेला. मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला. सदर घटनेची माहिती होताच काही नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. आम आदमी पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी घटनास्थळी येवुन वनविभागाला माहिती दिली. मनोहर वाणी हे घरचे कर्ते होते. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असून त्यांना 2 मुली आहे. मृतकाच्या कुटुंबाला 25 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. बाबूपेठ भागातील जंगल परिसरात काही दिवसांपासून बिबट व वाघाची दहशत सूरु आहे. दोन्ही वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली असून बंदोबस्त न झाल्यास वनविभाग विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.