जत; महातंत्र वृत्तसेवा : उमदी येथील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम शाळेतील १६९ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाली होती. या विद्यार्थ्यांना शाळेतील जेवण न देता बाहेरील जेवण दिल्याने विषबाधा झाली होती. याप्रकरणी जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत या प्रकरणात लक्ष घातले. आज त्यांनी दिलेल्या आदेशानुसार समता शिक्षण संस्थेचे सचिव, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक, प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक, आश्रमशाळेचे अधीक्षक यांच्यासह पाचजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची उमदी पोलिसात फिर्याद समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त जयंत मुरलीधर चाचरकर यांनी दिली आहे.
संस्थेचे सचिव श्रीशैल कलाप्पा होर्ती कर, प्राचार्य सुभाषचंद्र महादेवाप्पा होर्ती, सुरेश चनगोंड बगली, विकास तुकाराम पवार, अक्कमहादेवी सिद्धांना निवर्गी या पाच जणांनी निष्काळजी पणा व हयगय केल्याने विषबाधा झाल्याने जीवितास धोका व व्यक्तिगत सुरक्षिता धोक्यात आणण्याची कृती केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, उमदी येथील समता आश्रम शाळेत रविवारी (दि. ३१) विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाली होती. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १६९ वर पोहचली होती. तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी यंत्रणा व शासकीय यंत्रणांनी विद्यार्थ्यांना विविध रुग्णालयात दाखल करत उपचार करण्यात आले होते. विद्यार्थी सुरक्षित आश्रम शाळेत पोहोचले आहे. याप्रकरणी जत येथे ग्रामीण रुग्णालयात गृहनिर्माण व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी भेट देत विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची विचारपूस करण्यात आली होती. व संबंधिताची सखोल चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. सदरच्या आश्रम शाळेची अन्न प्रशासनाने जेवणाचे नमुने घेतले होते. तसेच समाज कल्याण विभागाचे आयुक्त कुशाल गायकवाड यांनीही भेट देऊन गंभीर प्रकरणाबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार अहवाल सादर होतात जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या आदेशाने गुरुवारी (दि. ३१) रात्री उशिरा उमदी पोलिसात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.