उत्तर सोलापूर, महातंत्र वृत्तसेवा: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे- पाटील यांच्या समर्थनार्थ उत्तर सोलापूर तालुक्यात आज (दि. ३१) अत्यावश्यक सेवा वगळत नान्नज गाव बंद ठेवत कडकडीत बंद पाळण्यात आला.
नान्नज येथे मराठा आरक्षण मागणीसाठी सोलापूर -बार्शी रस्त्यावर एक मराठा लाख मराठा, एकच मिशन मराठा आरक्षण… अशा घोषणा देत कृष्णात भोसले यांनी स्वत:ची दुचाकी पेटवून दिली. गावबंदमुळे स्टॅन्ड परिसर व गावात शुकशुकाट होता. उत्तर तालुक्यातील कोंडी, नान्नज, वडाळा, मार्डी, बीबीदारफळ गावात सकल मराठा समाज बांधवाकडून आमरण व साखळी उपोषण सुरू आहेत. तर आजपासून अकोलेकाटी व गुळवंची येथे साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे.
तालुक्यातील अनेक गावात साखळी कँडल मार्च, साखळी उपोषण, मुंडन आंदोलन, तिरडी आंदोलन सुरू आहेत. अनेक गावांत राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. साखळी उपोषणाला इतर समाजाचा ही पाठिंबा मिळत आहे. तर अनेक ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
पोलीस अधिकाऱ्यांची उपोषण स्थळाला भेट
उत्तर तालुक्यात साखळी उपोषण सुरू असलेल्या कोंडी, नान्नज, वडाळा, व्हनसळ, मार्डी, बीबीदारफळ व इतर गावांत उत्तर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी भेटी दिल्या. तालुक्यात शांतता असून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मराठा आरक्षण आंदोलनात दगडफेक, जाळपोळ सुरू झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करावी. आमचा त्यांना पाठिंबा नाही, आम्ही त्यांच्यासोबत नाही, असे आंदोलकांनी म्हटले आहे, असे शिंदे यांनी ‘दैनिक महातंत्र’ला सांगितले.
हेही वाचा