नागपूर : हिंगणा परिसरातील गेमिंग झोनला भीषण आग; मोठी हानी | महातंत्र
नागपूर; महातंत्र वृत्तसेवा :  नागपूर जिल्ह्यातील हिंगणा परिसरातील गेमिंग झोन आज भीषण आगीच्या विळख्यात सापडले. अलिकडेच काही आठवडयापूर्वी या  Xplore वाडी रोड, हिंगणा येथील गेमिंग झोनचे उदघाटन झाले. शनिवारी  हा परिसर  आगीच्या विळख्यात सापडल्याने एकच खळबळ उडाली. हे पार्क नागपूरचे सर्वात मोठे मनोरंजन पार्क म्हणून ओळखले जाते. मात्र, मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही आगीचे नेमके कारण समोर आलेले नाही.

सुदैवाने ही घटना पहाटेच्या सुमारास घडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून दिवसभर या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे कार्य सुरु होते. गर्दीच्या वेळी ही घटना घडली असती तर मोठी जीवघेणी ठरू शकली असती, या परिसरात कोणतीही अग्नीशमन सुरक्षा यंत्रणा न दिसल्याने यंत्रणांनी नाराजी व्यक्त केली.माध्यमांनी घटनास्थळी भेट दिली असता पुरेशा अग्निसुरक्षा आणि बचाव व्यवस्थेच्या अभावामुळेच ही आग सर्वत्र पसरल्याची माहिती आहे. दरम्यान, या एक्सप्लोरचे मालक रुत्विक जोशी यांनी सांगितले की आग कशामुळे लागली याबद्दल आम्हाला अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र, नियंत्रण आणण्यात यश आले आहे.मुख्य अग्निशमन अधिकारी बी चंदनखेडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, वाडी अग्निशमन केंद्राच्या व्यतिरिक्त त्रिमूर्ती नगर येथील अग्निशमन दल देखील घटनास्थळी दाखल झाले आहे.

आग कशी लागली या संदर्भात मात्र, भाष्य करण्याचे त्यांनी टाळले. आता नेमके फायर ऑडिट प्रत्यक्षात झाले की केवळ कागदावर यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अग्निशमन विभागाने योग्य सुरक्षेच्या उपाययोजना न करता या गेमिंग झोन सुविधेला परवानगी देताना संबंधित असुरक्षिततेकडे दुर्लक्ष कसे केले हा प्रश्न  देखील आता यानिमित्ताने परिसरात उपस्थित करण्यात येत आहे.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *