अमरावती36 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
राज्य शासनाच्यावतीने सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रभर वितरित केला जाणारा आनंदाचा शिधा येथील नागरिकांच्या टीकेचा धनी बनला आहे. दर्यापुरातील राष्ट्रीय समाज पक्षाने या धान्याच्या थैलीवर देवी-देवतांचे फोटो छापून त्यांची विटंबना केली, असा आरोप केला आहे.
आनंदाचा शिधामध्ये साखर, तेल, डाळ आदी जीवनाशक साहित्य स्वस्त धान्य दुकानामार्फत वितरित केले जात आहे. परंतु या जीवनावश्यक वस्तू ज्या पिशवीमध्ये लाभार्थ्यांला दिल्या जातात, त्या पिशवीवर महापुरुषांचे व देवी देवतांचे फोटो टाकण्यात आले आहे. दरम्यान शिधा वापरल्यानंतर पिशवीची विटंबना होत असून ही अशोभनीय बाब आहे. याची दखल घेण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने तहसीलदार डॉ. रवींद्रकुमार कानडजे यांच्यामार्फत थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
राज्य सरकार हे स्वतःच्या जाहिरात व प्रसिद्धीकरिता देवी-देवतांची व महापुरुषांची विटंबना करत आहे. ज्या पिशवीमध्ये आनंदाचा शिधा दिला जातो ती पिशवी काही दिवसातच आपल्याला सार्वजनिक रस्त्यावर, कंचराकुडीत दिसत आहे. त्यामुळे भविष्यात अनुचित घटनासुद्धा घडू शकते. त्यामुळे देवी देवतांचे व महापुरुषांचे फोटो काढून टाकावे. अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने राज्य शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण होले, तालुका अध्यक्ष राजेश पावडे, शहराध्यक्ष अनिकेत सुरपाटणे, आकाश नारे, मंगेश भालेराव, श्याम राऊत, सुधीर तायडे, संतोष पुनसे, अक्षय भालेराव यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.