नाशिक
कळवण, महातंत्र वृत्तसेवा : यंदा पावसाने देवळा तालुक्याकडे पाठ फिरवल्याने दुष्काळसदृश परिस्थितीत निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासोबत जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. खर्डासह देवळा तालुक्यातील असंख्य गावातील शेतकरी आपल्या जनावरांना लागणारा चारा घेण्यासाठी कळवण तालुक्यात येत आहेत. आज (दि २) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास खर्डा ता. देवळा येथील शेतकरी भास्कर खंडेराव पवार हे ट्रॅक्टरने कळवण येथून मका पिकाचा चारा आपल्या ट्रॅक्टरने घेऊन जात होते.
कळवण शहरातील गणेशनगर भागातील पेट्रोल पंपाशेजारील अवधूत आर्ट या बॅनर व्यावसायिकाने नविन मशिन घेतले आहे. हे मशीन त्यांच्या दुकानात उतरवत असतांना त्यांनी आनंदाच्या भरात फटाक्यांची आतिषबाजी केली. या फटाक्याची ठिणगी शेजारून जाणाऱ्या पवार यांच्या ट्रॅक्टरवर पडली व चाऱ्याने पेट घेतला. यात चारा जळुन खाक झाला असून नशिब बलवत्तर म्हणून शेतकरी भास्कर पवार व त्यांचा ट्रॅक्टर बचावला आहे. शेतकऱ्याचे चारा व ट्राॅलीचे नुकसान झाले आहे. दिवाळीचा फटाके वाजवतांना नागरिकांनी काळजी घ्यावी. तसेच जनावरांसाठी चारा घेऊन जाणारे वाहने जात असल्यास फटाके वाजवने थांबवावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक खगेंद्र टेभेंकर यांनी केले आहे.
हेही वाचलंत का?