तिवसा | अमरावती3 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
तिवसा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या वाठोडा (खुर्द) ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाला 50 हजार रुपयाची लाच घेताना आज, मंगळवार 5 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने येथील पंचायत समिती परिसरात त्यास रंगेहात अटक केली. केशव भीमराव मदने (वय-37) असे अटक करण्यात आलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे.
ACBने सापळा रचून रंगेहाथ पकडले
वाठोडा येथील कंत्राटदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ग्रामपंचायत हद्दीत केलेल्या सिमेंट काँक्रीट नाली बांधकामाचे दोन लाख आणि सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकामाचे 2 लाख 77 हजार अशा एकूण 4 लाख 77 हजार रुपयांच्या कामाची नोटशीट तयार करण्यात आली होती.
परंतु बिल मंजुरीसाठी पाठवल्याच्या मोबदल्यात 92 हजार रुपयांच्या लाचेची मागणी ग्रामसेवकाने केली होती. तडजोडीअंती 70 हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दाखवून पहिला हप्ता म्हणून 50 हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे पंचासक्षम मान्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज, 5 सप्टेंबर रोजी तिवसा पंचायत समिती परिसरात एसीबीच्या पथकाने सापळा रचून ग्रामसेवक केशव मदने यास रंगेहात अटक केली.
या अधिकाऱ्यांनी केली कारवाई
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाचे पोलिस अधीक्षक मारुती जगताप, अप्पर पोलिस अधीक्षक देवीदास घेवारे, पोलिस उपअधीक्षक शिवलाल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक केतन मांजरे व विजया पंधरे, पोलीस अंमलदार वैभव जायले, नितेश राठोड, युवराज राठोड, आशिष जांभळे, सतीश किटुकले यांनी पार पाडली.