पुणे5 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
आगामी गणेशोत्सवासाठी वर्गणी न दिल्याने तीन जणांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारातील सेवक वसाहतीत घडली आहे. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनेश वाल्मिकी (वय ३०), प्रतिक मल्हारी (वय 23, रा. दोघे रा. विद्यापीठ सेवक वसाहत), उमेश (वय 25, रा. चिखलवाडी, ओैंध) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. याबाबत कृष्णा किशोर तांबोळी (वय ३५, रा. विद्यापीठ सेवक वसाहत) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
सेवक वसाहतीत झाला राडा, बेदम मारहाण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार,कृष्णा तांबोळी आणि आरोपी वाल्मिकी, मल्हारी विद्यापीठाच्या आवारातील सेवक वसाहतीत राहायला आहेत. वाल्मिकी आणि मल्हारी यांनी तांबोळी यांच्याकडे गणेशोत्सवासाठी वर्गणीची मागणी केली होती. त्यावेळी तांबोळी यांनी वर्गणी देण्यास नकार दिला. सेवक वसाहतीतील मोठ्या मंडळाला वर्गणी दिली असल्याचे तांबोळी यांनी त्यांना सांगितले. या कारणावरुन त्यांच्यात मोठा वाद झाला. वाल्मिकी, मल्हारी आणि साथीदारांनी तांबोळींना बांबूने बेदम मारहाण केली. पोलीस नाईक एस रायकर पुढील तपास करत आहेत.
बस स्टेअरिंगचा दांडा तुटला, 10 प्रवासी जखमी
पुणे शहर जवळ राहू-वाघोली रस्त्यावर सांगवी फाटा परिसरात सोमवारी एका पीएमपी बसच्या स्टेअरिंगचा लोखंडी दांडा तुटल्याने बस रस्त्याकडेला चारीत शिरली. अपघातात पीएमपी बसमधील दहा प्रवासी जखमी झाले. जखमींमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.पुणे स्टेशन ते पारगाव या मार्गावरील पीएमपी बसमधून दौंड तालुक्यातील विद्यार्थी, नोकरदार दररोज पुण्यात ये-जा करतात. राहू-वाघोली रस्त्यावर सांगवी फाटा परिसरात सोमवारी सकाळी पीएमपी बसचा स्टेअरिंगचा लोखंडी दांडा तुटला. पीएमपी बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या चारीत शिरली. बसमधील दहा प्रवासी जखमी झाले. जखमींमध्ये महाविद्यलयीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे, अशी माहिती यवत पोलिसांनी दिली आहे.