मंत्रिपदाच्या 13 जागा मोकळ्या, पण मागणाऱ्यांची संख्या जास्त; अब्दुल सत्तारांनी दिली कबुली

Maharashtra Politics :  मंत्रिमंडळात सध्या राज्यमंत्रीच नसल्याने अधिवेशन काळात दोन्ही सभागृहात हजार राहणं अडचणीचं झालं आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) गरजेचा असला तरी मंत्रिपदाच्या केवळ 13 जागा उरल्या असताना मागणाऱ्यांची संख्या जास्त अशी स्थिती निर्माण झाल्याची कबुली राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी साडेतीन महिन्यानंतर माध्यमांसमोर मनमोकळी उत्तरं दिली. रविवारी (6 ऑगस्ट) पंढरपूर येथे त्यांच्या मतदारसंघातील वारकऱ्यांच्या गाथा पारायण कार्यक्रमासाठी सत्तार आले असता ते बोलत होते.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या जवळच्यांना मिळणार मंत्रिपद?

गेल्या साडेतीन महिन्यांपासून आपण माध्यमांपासून दूर राहिलो होतो, असं सांगताना आज देवाच्या दारात बोलतो असं म्हणत त्यांनी मनमोकळेपणाने चर्चा केली. गेल्या काही दिवसांपासून सत्तार आणि वाद असं गणित असल्याने यावेळी त्यांनी मोजूनमापून शब्दात उत्तरं दिली. सध्या सरकारला पाठिंबा देणारे 210 असल्याने नाराजीचा प्रश्न येत नसल्याचंही त्यांनी सांगितलं. मात्र विस्तारात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्या कोट्यातील योग्य व्यक्तीला मंत्रिपद देतील, असं सांगत विस्तारास कोणीही नाराज नसल्याचं ते म्हणाले . 

काय आहे मुख्यमंत्री शिंदेंचा प्लॅन बी?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ए प्लॅन सगळ्यांना दिसतो, मात्र त्यांचा बी प्लॅन देखील तयार असतो आणि तो कधीच फेल जात नाही, असं सत्तार म्हणाले. आमच्या 50 आमदारांसोबत अजून 25 आमदार निवडून आणायची ताकद मुख्यमंत्री शिंदेंमध्ये असल्याचा विश्वास सत्तार यांनी व्यक्त केला.

सत्तार म्हणतात, मी पुन्हा येईन…

यंदा सिल्लोड मतदारसंघातून गेल्यावेळी पेक्षा चारपट जास्त फरकाने विजयी होऊ, असं सत्तारांनी सांगत त्यांच्या विजयाचं गणित सांगितलं. सिल्लोड मतदारसंघात 3 लाख 20 हजार हिंदू आणि केवळ 60 हजार मुस्लिम असूनही आपण कायमच मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतो याचं कारण फक्त जनतेचा मिळवलेला विश्वास असल्याचं सत्तार म्हणाले. त्याच जोरावर मी पुन्हा येईन, असं मिश्किल पद्धतीने सत्तारांनी सांगितलं.

‘सरकार जावं यासाठी अनेकांनी गणपती पाण्यात ठेवले’

 एकनाथ शिंदे हेच राज्याचे मुख्यमंत्री राहणार असून हे सरकार जावं म्हणून अनेकांनी गणपती पाण्यात ठेवले आहेत, असंही सत्तार म्हणाले. एक शेतकऱ्याचा मुलगा, रिक्षाचालक, कट्टर शिवसैनिक ते मुख्यमंत्री असा कष्टाळू प्रवास करून मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदेंचं यश तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आल्यानं अनेकांना ते आवडत नसल्याचं सत्तार म्हणाले. महाराष्ट्रातील जनतेला शिंदेंनी आपल्या कामाने जिंकलं असल्याचा टोला सत्तार यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

‘शिंदे गटातून एकही आमदार बाहेर पडणार नाही’

या पाच वर्षात जे जे राजकीय नाट्य घडत गेलं तसं यापूर्वी कधीही घडलं नव्हतं, त्यामुळे या पाच वर्षांचा इतिहास सुवर्णाक्षराने इतिहासकारांनी लिहिण्यासारखं असल्याचं सत्तार म्हणाले आणि युत्या आणि आघाड्यांवर अप्रत्यक्षपणे टीका केली. आमच्या पन्नास आमदारांत थोडीफार कुरबुर होत असली तरी एवढ्या मोठ्या कुटुंबात थोडी उन्नीसबीस चालते, असं सांगत शिंदे गटातील कुरबुरीची कबुली देखील सत्तारांनी दिली. शिवसेनेतून बाहेर एकही आमदार पडणार नसून उलट उद्धव सेनूतून किती येतात ते भविष्यात दिसेल, असा टोलाही त्यांनी संजय राऊत यांना लगावला.

हेही वाचा:

Amit Shah On Ajit Pawar : अजितदादा, तुम्ही उशीर केलात, आता योग्य ठिकाणी बसले आहात; अमित शहाचं पुण्यातील जाहीर कार्यक्रमात मोठं वक्तव्य

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *