पुणेएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
पुणे महानगरपालिका वैद्यकिय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकिय महाविद्यालय, पुणे येथील अधिष्ठाता (डिन) एम.बी.बी.एस.च्या एका प्रवेशासाठी दहा लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या (एसीबी)च्या जाळ्यात रंगेहाथ अडकले आहे. आशिष श्रीनाथ बनगिनवार (वय -54 वर्ष, अधिष्ठाता (वर्ग-1)) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डीनने केली होती 16 लाखांची मागणी
याबाबत तक्रार दाखल केलेल्या 49 वर्षीय तक्रारदार यांचा मुलगा एनईईटी परिक्षा- 2023 मध्ये उत्तीर्ण झाला होता. त्याची एम.बी.बी.एस.च्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्याच्या पहिला कैंप राऊंडमध्ये पुणे महानगरपालिका वैद्यकिय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकिय महाविद्यालय, पुणे येथे इन्स्टिट्युशनल कोटा मधून निवड झाली होती. या निवड यादीचे आधारे तक्रारदार हे वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन आशिष बनगिनवार यांना मुलाचे एम.बी.बी.एस. च्या महाविद्यालयात प्रवेश प्रक्रीयेसाठी भेटले. त्यावेळी त्यांनी दरवर्षाची शासनमान्य विहीत फी 22 लाख 50 हजार रुपये व्यतिरिक्त प्रवेशासाठी 16 लाख रुपये लाच मागणी केली.
पहिला हप्ता 10 लाख स्विकारताना केली अटक
याबाबतची तक्रार तक्रारदार यांनी एसीबीकडे केली. त्यानुसार तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीची पडताळणी केली असता, डीन आशिष बनगिनवार यांनी तक्रारदारयांच्या मुलाचे एम. बी. बी.एस. च्या प्रवेशासाठी तडजोडीअंती 16 लाख रुपये लाच रक्कम म्हणून मागणी करून, त्यापैकी पहिला हप्ता 10 लाख रुपये त्यांचे कार्यालयात स्विकारल्यावर त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. याबाबत समर्थ पोलिस स्टेशन, पुणे शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस उपअधीक्षक सुदाम पाचोरकर पुढील तपास करत आहेत. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याची माहिती एसीपी नितीन जाधव यांनी दिली आहे.