‘खरंतर बोलू नये पण परिस्थिती अशी आहे म्हणून…’; उपोषण करणाऱ्या जरांगे पाटलांच्या प्रकृतीसंदर्भात डॉक्टरची पोस्ट

Manoj Jarange Patil Hunger Protest Health: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणावर बसलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती खालावली आहे. रविवारी सायंकाळी उपस्थितांबरोबर संवाद साधण्यासाठी मनोज जरांगे-पाटील स्टेजवर उभे राहण्याचा प्रयत्न करत असतानाच अशक्तपणामुळे ते कोसळले. त्यानंतर उपस्थितांच्या आग्रहानंतर त्यांनी थोडं पाणी प्यायलं. आज म्हणजेच मंगळवारी (31 ऑक्टोबर 2023 रोजी) मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा सातवा दिवस आहे. मनोज जरांगेंच्या शरीरावर या आमरण उपोषणाचा नेमका काय परिणाम होत आहे यासंदर्भातील एका डॉक्टरांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अर्थात ही पोस्ट मनोज जरांगे-पाटील समर्थकांची चिंता वाढवणारी असली तरी एवढ्या दिवस अन्नशिवाय राहिल्याने शरीरामध्ये नेमके काय बदल होतात हे या पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

अन्न न खाता माणूस…

मुळचे लातूरचे असणारे आणि सध्या पुण्यात वास्तव्यास असलेले डॉ. प्रकाश कोयाडे यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन मनोज जरांगे-पाटील यांच्या प्रकृतीसंदर्भात चिंता वाटत असल्याचं सांगत पोस्ट केली आहे. सध्या ही पोस्ट अनेकांचं लक्ष वेधून घेत आहेत. डॉ. प्रकाश कोयाडे यांनी आपल्या पोस्टमध्ये उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे-पाटील यांचा आंदोनलस्थळावरील फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये डॉ. प्रकाश कोयाडे म्हणतात, “अन्न न खाता माणूस फक्त पाण्यावर साधारणपणे तीन ते चार आठवडे जगू शकतो तर अन्न आणि पाणी दोन्ही शिवाय साधारणपणे एक आठवडा माणूस जगू शकतो.” पुढे लिहिताना डॉ. प्रकाश कोयाडे यांनी, “अगदी शंभर टक्के प्रत्येकवेळी हे असंच घडतं असं नाही तर त्या व्यक्तीचं शरीर, भौतिक परिस्थिती, मानसिक स्थिती बऱ्याच गोष्टींचा थोडाफार फरक पडतो,” असंही नमूद केलं आहे.

…की शरीरातील मांसपेशी तुटू लागतात

सोमवारी मनोज जरांगे-पाटील यांनी संवाद साधण्यासाठी माईक हाती घेतला तेव्हा त्यांचा हात थरथरत होता. या गोष्टीकडे लक्ष वेधत डॉ. प्रकाश कोयाडे यांनी हे लक्षण बरं नाही असं म्हटलं आहे. “जरांगे पाटलांचा आज (30 ऑक्टोबर) उपोषणाचा सहावा दिवस आहे. माईक हाती धरताना त्यांचे  हात थरथरत होते. हे लक्षण काही ठीक नाही,” असं डॉ. प्रकाश कोयाडे यांनी म्हटलं आहे. “व्यक्तीचं वजन बऱ्यापैकी असेल तर अन्न न मिळाल्यामुळे आधी शरीरातील फॅट वापरलं जातं आणि शरीराला तग धरायला वेळ मिळतो. एकदा का फॅट संपलं की शरीरातील मांसपेशी तुटू लागतात कारण शरीराकडे उर्जा मिळविण्याचा तो एकच पर्याय असतो. अशावेळी प्रतिकूल लक्षणं दिसायला लागतात जशी की, अशक्तपणा, चक्कर येणं, त्यातीलच एक म्हणजे हे हातांची थरथर,” असं या पोस्टमध्ये पुढे डॉ. प्रकाश कोयाडे यांनी म्हटलं आहे.

Related News

अवस्था एवढी नाजूक आहे की…

“या दरम्यान तयार झालेले किटोन्स फार घातक ठरतात. खरंतर बोलू नये पण परिस्थिती अशी आहे म्हणून लिहावं लागतंय. या लक्षणांची परिणीती फार अवघड होऊ शकते. अगदी ब्लड प्रेशर कमी होणं, अवयव निकामी होणं, हृदयाची गती मंदावणं, हृदयाचा झटकासुद्धा… माझी पुढचं काही बोलायची इच्छा नाही! एकंदरीत सगळी परिस्थिती पाहता त्यांची अवस्था एवढी नाजूक आहे की, आत्ता…‌ अगदी या क्षणी वैद्यकीय उपचार सुरू होणं आवश्यक आहे,” असंही आपल्या पोस्टमध्ये डॉ. प्रकाश कोयाडे यांनी म्हटलं आहे.

एक डॉक्टर म्हणून हे…

“जरांगे पाटील… माणूस वाचला पाहिजे… वेळ फार कमी आहे. काहीतरी निर्णय होणं आवश्यक आहे. एक डॉक्टर म्हणून हे बघवत नाही,” असं म्हणत डॉ. प्रकाश कोयाडे यांनी पोस्टचा शेवट केला आहे.

मुंबईत झाली बैठक

दरम्यान, सोमवारी रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहीत सत्तेत असलेल्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांची मुंबईमध्ये बैठक झाली. मराठा आरक्षणासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं समजतं.

सोमवारी रात्री मुंबईत झालेल्या बैठकीनंतर आज सरकार मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन बोलवण्याचा किंवा अध्यादेश जारी करण्यासंदर्भातील निर्णय घेऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *