अधीर रंजन चौधरी यांच्या विधानांवरुन प्रचंड गदारोळ; वादग्रस्त विधान कामकाजातून वगळले | महातंत्र

नवी दिल्ली, महातंत्र वृत्तसेवा  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आपणास नीरव मोदी दिसत असल्याचे आक्षेपार्ह वक्तव्य काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभेत केले. त्यांच्या या विधानावर सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. यावर संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह  भाजप खासदारांनी चौधरी यांनी माफी मागावी, अन्यथा अध्यक्षांनी कामकाजातून त्यांचे शब्द वगळावेत, अशी मागणी केली. अखेर अध्यक्षांनी वादग्रस्त विधान वगळण्याचे निर्देश दिले. ‘घोटाळा करून नीरव मोदी विदेशात पळून गेले, पण आम्हाला येथेच देशात नीरव मोदी दिसत आहेत..’. असा टोमणा चौधरी यांनी पंतप्रधानांना उद्देशून मारला होता.

चौधरी यांनी आपल्या घणाघाती भाषणात ‘जेथे राजा आंधळा असतो, तेथे द्रौपदीचे वस्त्रहरण होते’ अशी टीका केली. यावरुनही सदनात गोंधळ झाला. मणिपूरमध्ये हाहाकार उडाला आहे, पण संसदेत मणिपूरच्या खासदारांना बोलू दिले जात नाही, असे सांगतानाच दोन समुदाया दरम्यान बफर झोन निर्माण करुन मणिपूरला विभाजण्याचे काम गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे, असा आरोप त्यांनी केला. नरेंद्र मोदी शंभरवेळा पंतप्रधान होवोत, त्याच्याशी आमचे देणेघेणे नाही. पण आम्हाला लोकांची चिंता आहे, असे ते म्हणाले.

चौधरी बोलत असतानाच पंतप्रधान मोदी यांचे सदनात आगमन झाले. त्याचा संदर्भ देत चौधरी यांनी अविश्वास प्रस्तावात ताकत इतकी असते की पंतप्रधानांना सदनात यावे लागते, असा टोमणा मारला. देशातून ज्या गोष्टी हद्दपार होण्याची गरज आहे, त्यात जातीयतावाद, विभाजनवाद, भगवावाद यांचा समावेश असल्याचे चौधरी म्हणाले.

मणिपूरच्या घटनेचा विरोधी पक्षांकडून राजकीय पोळी भाजण्यासाठी उपयोग – ज्योतिरादित्य शिंदे 

भाजप नेते व केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काॅंग्रेससह अन्य विरोधी पक्षांचे आरोप खोडून काढले. शिंदे यांच्या काही विधानांवर आक्षेप घेत विरोधकांनी सभात्याग केला. विरोधी पक्षांना पंतप्रधानांकडून निवेदन हवे आहे, पण ते संसद चालवू देत नाहीत, असा आरोप करुन शिंदे यांनी यावेळी केला.

शिंदे म्हणाले की, मणिपूरची घटना दुर्दैवी आहे, पण या घटनेचा उपयोग विरोधी पक्ष आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी करु पाहत आहेत. ईशान्य भारतात काॅंग्रेसच्या सत्ता काळात जितक्या दंगली, हिंसाचार आणि हत्या झाल्या, तितके अन्य कोणाच्याही सत्ता काळात झाले नाही. विरोधी आघाडीने आपले नाव बदलून ‘आयएनडीआयए’ ठेवले आहे. पण या दुकानात भ्रष्टाचार, तुष्टीकरण, वंशवाद हाच जुना माल आहे. काँग्रेसचे दुकान प्रेमाचे दुकान नसून ते खोटेपणाचे दुकान आहे.

हेही वाचलंत का?

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *