Aditya L1 : सूर्यावर स्वारीसाठी भारत सज्ज | महातंत्र

श्रीहरिकोटा; वृत्तसंस्था : ‘चांद्रयान-3’च्या अभूतपूर्व यशानंतर आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ‘इस्रो’कडून सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य एल-1’ ही मोहीम राबवण्यात येणार आहे. त्यानुसार शनिवारी (दि. 2) सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी येथील सतीश धवन केंद्रातून ‘आदित्य एल-1’चे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

ही भारताची पहिलीच सौरमोहीम असणार आहे. याची तयारी पूर्ण झाली असून, ‘आदित्य एल-1’ उपग्रह श्रीहरिकोटा येथील लाँच पॅडवर सज्ज झाला आहे. या मोहिमेची रंगीत तालीमही यशस्वीरीत्या पार पडली असून, आता ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांचे एक पथक ‘आदित्य एल-1’च्या छोट्या मॉडेलसह तिरुमला व्यंकटेश्वर मंदिरात प्रार्थना करण्यासाठी दाखल झाले आहे. ‘इस्रो’ने याबाबत ट्विटद्वारे माहिती दिली आहे. ‘आदित्य एल-1’ला अवकाशात घेऊन जाणार्‍या ‘पीएसएलव्ही-सी 57’ या रॉकेटचे काही फोटोही ‘इस्रो’ने पोस्ट केले आहेत. श्रीहरिकोटा येथील दुसर्‍या लाँच पॅडवरून हे रॉकेट प्रक्षेपित करण्यात येणार आहे.

प्रक्षेपणानंतर सुमारे चार महिने हा उपग्रह अंतराळात प्रवास करेल. सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये असणार्‍या एका लॅग्रेंज पॉईंटवर तो ठेवण्यात येईल. हा पॉईंट पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटर दूर आहे. हे अंतर चंद्राच्या तुलनेत चार पटींनी अधिक आहे. त्यामुळे या ठिकाणी पोहोचण्यासाठी ‘आदित्य एल-1’ला सुमारे चार महिन्यांचा कालावधी लागेल, असा ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.

अनेक रहस्ये उलगडणार

या मोहिमेच्या माध्यमातून ‘इस्रो’ सूर्याचा अधिक चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकेल. सूर्याच्या पृष्ठभागावरील तापमान, सौरवादळे, कॉस्मिक रेंज आणि इतर बर्‍याच गोष्टींचा अभ्यास करणे ‘इस्रो’ला शक्य होणार आहे. यासोबतच लॅग्रेंज पॉईंटजवळच्या कणांचाही अभ्यास ‘आदित्य एल-1’ करणार आहे.

त्याखेरीज सूर्याबद्दल माहीत नसलेली अनेक रहस्ये उलगडली जातील, अशी अपेक्षा आहे. सूर्याचे जे वेगवेगळे थर आहेत, त्याबद्दल माहिती मिळेल. ‘आदित्य एल-1’चा कालावधी पाच वर्षांचा असेल. या काळात तो सूर्याभोवती फेर्‍या मारेल आणि सूर्यावरील वादळे व अन्य घडामोडींसंबंधी माहिती मिळवेल. ‘चांद्रयान-3’प्रमाणेच ‘आदित्य एल-1’ सर्वप्रथम पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करेल. काही फेर्‍या मारेल. त्यानंतर 15 लाख किलोमीटरचा प्रवास करून ‘एल-1’ पॉईंटवर पोहोचेल. या पॉईंटवर फेर्‍या मारताना ‘आदित्य एल-1’ सूर्याच्या बाहेरच्या थराबद्दल माहिती देईल.

‘आदित्य’ मोहिमेचा खर्च फक्त 400 कोटी रुपये

‘इस्रो’ने आपल्या प्रत्येक अंतराळ मोहिमेंतर्गत नवनवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. अन्य देशांच्या तुलनेत भारताने अल्प खर्चात सूर्यमोहिमेची आखणी केली आहे. त्यानुसार ‘आदित्य’ मोहिमेचा खर्च फक्त 400 कोटी रुपये आहे. यातुलनेत अमेरिकेच्या ‘नासा’ला सूर्यमोहिमेसाठी 12,300 कोटी रुपये खर्च आला होता. चांद्रयान मोहीमसुद्धा भारताने सुमारे 600 कोटी रुपयांत पार पाडली होती. जगातील अनेक देशांना याचे कौतुक वाटते. त्यामुळेच यातील अनेक देश ‘इस्रो’सोबत काम करण्यासाठी उत्सुक आहेत.

हेही वाचा

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *