लातुरात तब्बल चार हजार जणांना डोळ्याच्या साथीची लागण; काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

वैभव बालकुंदे झी मीडिया लातूर : राज्यात डोळे येण्याची साथ (conjunctivitis symptoms) सुरू असून जिल्ह्यातही या साथीचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. लातूर जिल्ह्यात (Latur News) या साथीचे चार हजार 64 रुग्ण आढळून आले असून त्यापैकी दोन हजार 514 रुग्ण उपचाराअंती पूर्ण बरे झाले आहेत. उर्वरित रुग्णांवर नेत्रतज्ञांच्या सल्ल्याने घरी उपचार सुरू आहेत. डोळे येणे हा साथरोग असून याबाबत लहान मोठ्या सर्वांनीच काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
 
साथीबाबत जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठकीत डॉ. पाठक यांनी ही माहिती दिली. डोळ्याच्या साथीबाबत नागरिकांनी घाबरून न जाता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी ठाकूर यांनी बैठकीत केले. सहाय्यक जिल्हाधिकारी नमन गोयल, आरोग्य उपसंचालक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी बरे उपस्थित होते.

बुलढाण्यात सर्वाधिक रुग्ण

डोळ्यांच्या साथीची लागण झालेल्या सर्वाधिक रुग्णांची संख्या बुलढाण्यात असून, त्यापाठोपाठ जळगाव, अमरावती आणि पुण्यात रुग्ण आढळले आहेत. रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने आरोग्य विभाग अधिक रुग्णंसख्येच्या भागात सर्वेक्षण करून उपाययोजना करीत आहे. डोळे येण्याचे सर्वाधिक 30 हजार 592 रुग्ण बुलढाणा जिल्ह्यात आढळले आहेत. 

Related News

डोळे येण्याची लक्षणे

डोळ्यांमध्ये काही तरी गेल्यासारखे खुपते.

एक-दोन दिवसांत डोळा लाल दिसू लागतो.

डोळ्यांतून सुरुवातीला पाणी, नंतर चिकट घाण येऊ लागते.

सकाळी उठल्यावर पुवाने दोन्ही पापण्या चिकटल्या जातात.

डोळ्यांतून सतत पाणी येणे, जळजळ होणे व प्रकाश सहन न होणे.

नागरिकांनी अशी काळजी घ्यावी

डोळयांच्या साथीच्या बाबतीत नागरिकांनी घाबरून न जाता डोळे लाल होणे, डोळ्यातून वारंवार पाणी येणे, डोळ्यांमध्ये टोचल्यासारखे वाटणे, डोळ्यांमध्ये चिकट पाणी येणे आदी लक्षणे जाणवल्यास तत्काळ नेत्रतज्ञांचा सल्ला घेऊन उपचार सुरु करावा.

हा आजार संसर्गजन्य असून एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये वेगाने पसरतो. यामुळे डोळ्यांच्या साथीची लागण झालेल्या रुग्णांनी घराच्या बाहेर न फिरता घरीच क्वारंटाईन व्हावे. डोळ्यांना गॉगल लावावा, रुग्णांनी टॉवेल, रुमाल, साबण आदी वस्तू स्वतंत्र ठेवून इतरांना वापरण्यास देऊ नयेत. सदर रुग्णांनी जनसंपर्कात येऊ नये.

संसर्ग झालेल्या रुग्णांनी वारंवार डोळ्यांना हात लावू नये. इतर वस्तू व व्यक्ती यांना स्पर्श करु नये. स्विमींग पुलामध्ये पोहण्यासाठी जाऊ नये. स्विमींग पुलाच्या माध्यमातून संसर्ग जास्त पसरण्याची शक्यता आहे.

शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संसर्ग झाल्यास अशा विद्यार्थ्यांनी उपचारादरम्यान किमान सात दिवस घरीच राहावे.



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *