निपाणी; महातंत्र वृत्तसेवा : निपाणी शहर व परिसरात तब्बल 16 दिवसानंतर गुरुवारी (दि. ३१) रात्री आठ वाजता सुमारे तासभर पावसाने हजेरी लावली. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने खरिपातील पिकांना धोका निर्माण झाला होता. दरम्यान या झालेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला असुन आसळका या नक्षत्रातील पावसाची सांगता गुरुवारी होवुन पूर्वा फाल्गुनी (सुनांच्या पाऊस) नक्षत्रातील पावसाला सुरुवात झाली आहे.
यंदा पावसाला उशिरा सुरुवात झाल्याने खरिपातील पिकांच्या पेरण्याही उशीर झाल्या आहेत.दरम्यान उशिरा पेरण्या होऊनही खरिपातील भुईमूग, सोयाबीनसह इतर पिकांची स्थिती चांगली आहे.सद्यस्थितीत शिवारात तंबाखू लावणीला सुरुवात झाली आहे.दरम्यान गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने एकदमच उघडीप दिली होती.त्यामुळे पडलेल्या कडक उन्हामुळे खरिपातील पिकांना धोका पोहोचला होता. शिवाय उष्णतेच्या प्रमाणात मोठी वाढ झाली होती तसेच तंबाखू लावणीही रखडल्या होत्या.त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला होता.
अखेर गुरुवारी पूर्व फाल्गुनी या नक्षत्रातील पावसाने चांगली सुरुवात करून निपाणी परिसराला झोडपुन काढले. रात्री आठ वाजता सुरू झालेला हा पाऊस रात्री उशिरापर्यंत पडत होता.त्यामुळे सखल भागात पाणी साचून राहिले होते.
दरम्यान पावसाला दमदार सुरूवात झाल्याने हवेत काहीसा गारटा निर्माण झाला होता.तबल पंधरा दिवसानंतर पाऊस झाल्याने शेतकरी वर्ग सुखावला असून शेतकरी वर्गाने उघडीपीच्या काळात आंतरमशागतीची कामे आटोपून घेतली असून,गुरुवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे पुन्हा खरिपातील पिके बहरणार असून, साहजीकच रखडलेल्या तंबाखूपिक लावणीलाही जोर येणार आहे.
चौकट…
यंदाच्या हंगामातील सहाव्या नक्षत्रातील पावसाची सांगता झाली असून गुरुवार दि.31 रोजी सातव्या नक्षत्रातील पूर्वा फाल्गुनी (सुना) या नक्षत्रातील पावसाला सुरुवात झाली आहे.या पावसाचे वाहन मोर आहे.दरम्यान निपाणी परिसरात यापूर्वी दि. 16 ऑगस्ट रोजी पाऊस झाला होता.त्यानंतर पावसाने पूर्णपणे उघडीप दिली होती.