बीड9 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कोण? पक्ष कोणाकडे आहे? हा सगळ्या जनतेचा महासागर पाहिल्यानंतर हे सिद्ध होतंय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार यांच्यासोबत आहे. त्याचे अध्यक्ष अजित दादा आहेत, असा दावा छगन भुजबळ यांनी केला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित राहिले असून जनतेला संबोधित केले आहे. यावेळी छगन भुजबळ यांनी मार्गदर्शन केले.
मग अजित पवारांना मान्यता देऊन टाका
छगन भुजबळ म्हणाले की, शरद पवार साहेबांनी बैठका घेतल्या. पहिल्या बैठकीत छगन भुजबळ, दुसऱ्या बैठकीत धनजंय मुंडे, तिसरा नंबर हसन मुश्रीफ यांचा. इकडून गाडी बारामतीहून फिरून आली की अजितदादा आमचे नेते आहेत. आमच्याविरोधात मीटिंग झाल्यानंतर बारामतीचा प्रश्न आला की अजित पवार आमचे नेते आहेत असं शरद पवार आणि सुप्रिया सुळे म्हणणार. मग अजित पवारांना उपमुख्यमंत्री म्हणून मान्यता देऊन टाका आणि मिटवून टाका भांडण, नेते आहेत ना तुमचे! असंही छगन भुजबळ म्हणाले.
कॉंग्रेस फुटली नसती तर मी मुख्यमंत्री झालो असतो
छगन भुजबळ म्हणाले की, काँग्रेसचे मुकुल वासनिक, कलमाडी, माधराव शिंदे, शिला दिक्षित सतत फोन करत होते, भुजबळ तुम्ही दिल्लीला या. पवारांसोबत जाऊ नका, सांगत होते. पुढचा मुख्यमंत्री म्हणून आम्ही तुम्हाला जाहीर करतो, असं आश्वासन दिलं. कारण शिवसेना आणि काँग्रेसला विरोधी पक्षनेता म्हणून अंगावर घेतलं होतं. एवढं अंगावर घेतलं होतं की घरावर हल्ला झाला. तुमच्या आशीर्वादाने छगन भुजबळ वाचला”, असंही छगन भुजबळ म्हणाले. काँग्रेस पक्ष फुटला नसता तर छगन भुजबळ मुख्यमंत्री झाला असता. दादा म्हणाले दोनवेळा मुख्यमंत्री पद गेलं. दादा असंच असतं राजकारणात”, असंही ते खेदाने म्हणाले.
दादा कोंडकेंसारखे डबल मिनिंग जोक्स कधीपासून
पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, साहेब आम्ही तुमच्यासोबत राहिलो की नाही हा प्रश्न आहे. आमचं काय चुकलं? आमच्यावर का हल्ले करताहेत. अमरसिंह पंडितांचं नाव घेऊन काहीतरी बोलता. दादा कोंडकेंसारखे डबल मिनिंग जोक्स कधीपासून करायला लागलात? हे तुम्हाला शोभत नाहीत. आम्ही तुमच्याकडून शिकलो, पण असं बोलायला आम्ही शिकलो नाही. पण तुम्हीच असं बोलायला लागलात”, असंही भुजबळ म्हणाले.
मग आता काय झाले…
जयंत पाटील दिल्लीला जायचे, चर्चा करायचे. आम्हाला एवढे आमदार-खासदार पाहिजेत. एवढी आमची कामं आहेत. त्यात मी नव्हतो, मुंडेंही नव्हते. मग आता काय झालं?, असा सवाल भुजबळांनी केला.
त्यावेळी भुजबळ तुमच्याबरोबर होता
आमच्या येथे साहेब म्हणाले की, मी माफी मागायला आलोय, चूक झाली. काय चूक झाली तर भुजबळांना उभं केलं. अरे भुजबळ चार वेळा निवडून आला. पवार माफी मागतो म्हणाले. माफी मागायची असेल तर गोंदियापासून कोल्हापूरपासून कुठे कुठे माफी मागणार? हा रस्ता दाखवला कोणी? साहेब हा रस्ता तुम्ही दाखवला, असे म्हणत भुजबळांनी पवारांना टोला लगावला.
2019 मध्ये अजित दादांनी सकाळी शपथविधी घेतला, तुम्ही सांगितलं की ती गुगली होती. ही कसली गुगली? स्वतःच्याच प्लेअरला आऊट करायचं का? राजकारणात अशा गुगल्या असतात का?, असा हल्लाबोलही त्यांनी केला. आम्ही लढत होतो, आमच्यावरही ईडीची कारवाई झाली, छगन भुजबळ अडीच वर्षे आतमध्ये गेला.
बाहेर आल्यावर पुन्हा तुमच्यासोबत उभा राहिलो. तुम्ही म्हणता घाबरले म्हणून गेलो. छगन भुजबळ तुमच्यासोबत राहिला. 1991 पासून तुमच्यासोबत आहे, ज्यावेळी काँग्रेसमधून बाहेर काढलं तेव्हा कोणी नव्हतं तेव्हा छगन भुजबळ पहिला माणूस होता जो तुमच्याबरोबर उभा राहिला, असेही छगन भुजबळ म्हणाले.