फक्त पदकच नाही, तर मनही सोन्याचं! विजयानंतर नीरज चोप्राचं ‘ते’ कृत्य पाहून पाकिस्तानही भारावला

भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने (Neeraj Chopra) पुन्हा एकदा सुवर्ण कामगिरी केली असून, इतिहास रचला आहे. नीरज चोप्राने World Athletics Championships मध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे. World Athletics Championships मध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. नीरज चोप्राने 88.17 मीटर दूर भाला फेकत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. दरम्यान यावेळी पाकिस्तानी भालाफेकपटू अर्शद नदीमने (Arshad Nadeem) रौप्यपदक जिंकलं. सामन्यानंतर नीरज चोप्रा आणि अर्शद नदीम फोटोसाठी एकत्र आले होते. दोन देशांमधील वाद विसरत दोन्ही खेळाडूंनी एकत्र येत केलेलं हे फोटोशूट अनेकांचं मन सुखावणारं होतं. विशेष म्हणजे, नीरज चोप्राने फोटो काढला जात असताना अर्शद नदीमला बोलावलं. त्याच्या या कृत्याने नेटकरी भारावले असून, सर्वांची मनं जिंकली आहेत. 

नीरज चोप्रा आणि अर्शद नदीम मैदानावर नेहमीच एकमेकांना पाठबळ देत असतात. दोघेही एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असून, भालाफेकमध्ये कडवं आव्हान असतं. पण असं असतानाही सामना संपल्यानंतर मात्र दोघे खिलाडीवृत्तीने एकमेकांचं कौतुक करत भेटत असतात. 

World Athletics Championships मध्ये नीरजसमोर अर्शद नदीमचं मोठं आव्हान होतं. कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या अर्शद नदीमचा पुन्हा एकदा 90 मीटर अंतर पार करत सुवर्णपदक जिंकण्याचा प्रयत्न होता. पण पुन्हा एकदा त्याचे प्रयत्न तोकडे पडले. दरम्यान सुवर्णपदक जिंकल्यानंतर मैदानावर फोटो काढला जात असताना, नीरज चोप्राने अर्शद नदीमला बोलावून घेतलं. यानंतर अर्शद नदीमही लगेच नीरजच्या शेजारी उभा राहिला. नीरज चोप्राने हातात तिरंगा पकडलेला होता. तर दुसऱ्या बाजूला कांस्यपदक जिंकणारा जॅकब उभा होता. 

याशिवाय आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत निकाल लागल्यानंतर नीरज चोप्रा आणि अर्शद नदीम एकमेकांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. 

दरम्यान, भालाफेकच्या अंतिम सामन्यात नीरज चोप्राची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्या प्रयत्नात त्याचा पाय रेषेच्या पुढे गेला होता. पण दुसऱ्या प्रयत्नात त्याने थेट सुवर्णपदकच नावावर केलं. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. दरम्यान, पाकिस्तानाच अर्शद नदीम रोप्यपदक जिंकत दुसऱ्या क्रमांकावर राहिला. 

नीरज चोप्राने नदीमवर आणखी एकदा मात केली आहे. 2016 च्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतही नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकलं होतं. तेव्हापासून दोघे मैदानावर एकमेकांना कडवं आव्हान देत आहेत. Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *