जालना : आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक; भोकरदन तालुक्यात अचानक चक्काजाम आंदोलन | महातंत्र
भोकरदन; महातंत्र वृत्तसेवा : मराठा आरक्षणासाठी मनोज पाटील जरांगे हे गेल्या पाच दिवसापासून आमरण उपोषणास बसले आहेत. अन्न-पाणी नसल्याने रविवारी (दि. २९) पाटील यांची प्रकृती खालावल्याने सरकार विरोधात सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. भोकरदन येथे रविवारी रात्री नऊ वाजता राज्य परिवहन महामंडळाच्या येणाऱ्या बसवर असलेले नेत्याच्या फोटोला काळे फासून निषेध तर केदारखेडा येथे मराठा समाजाचे बांधवांनी चक्काजाम आंदोलन सुरू केल्याने जालन्याकडे जाणाऱ्या आणि भोकरदनकडे येणाऱ्या सर्व वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.

मनोज जरांगे पाटील यांचे गरजवंत मराठ्याला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी शहरासह तालुक्यात विविध गावात बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. दरम्यान भोकरदन येथे राज्य परिवहन महामंडळाच्या येणाऱ्या जाणाऱ्या बसेसवर असलेले  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोला काळे फासून निषेध व्यक्त करण्यात आला. केदारखेडा येथे जालना-भोकरदन रस्त्यावर टायर जाळून चक्काजाम आंदोलन सुरू करण्यात आले. त्यामुळे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान सरकारने मराठा आरक्षणावर तात्काळ तोडगा न काढल्यास आंदोलन आणखीन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

दगडफेक आणि जाळपोळ

दरम्यान केदारखेडा गावाजवळ संतप्त जमावाने किरकोळ दगडफेक केल्याने वाहनांची पळापळ सुरू झाली होती. काही वाहने परत फिरून राजूच्या दिशेने गेली, यानंतर वाहनांचे टायर जाळण्यात आल्याने वाहने मोठ्या प्रमाणात थांबली आहे.

हैदराबादकडे जाणाऱ्या वाहनांना अडथळा

तब्बल दोन तासापासून भोकरदन जालना महामार्गावरील केदारखेडा गावाजवळ हे आंदोलन सुरू झाल्याने लांब पल्ल्याच्या हैदराबादकडे जाणाऱ्या वाहनांची देखील अडचण झाली आहे. केदारखेडा गावापासून जालना कडे दोन तीन किलोमीटर तर दुसऱ्या बाजूने भोकरदन कडे तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय बरंजळा गावातून जाणारा रस्ता देखील या ठिकाणी बंद करण्यात आला आहे.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *