अहमदनगर; महातंत्र वृत्तसेवा : शाळकरी मुलीचा पाठलाग करून छेड काढणार्याला कोतवाली पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी नगरमधून पसार झाला होता. मात्र, कोतवालीचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी आरोपीच्या शोधासाठी दोन पथके पुण्यात पाठविली व आरोपीच्या मुसक्या आवळल्या. अक्षय बंडू कुर्हाडे (वय 23 वर्ष, रा. अनुसयानगर, कल्याण रोड, ता. जि. नगर, मुळ रा. टाकळी अंबड, ता.पैठण, जि. औरंगाबाद) असे आरोपीचे नाव असून, न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
शहरातील एका शाळेत शिकणार्या 11 वर्षीय अल्पवयीन मुलीचा आरोपी अक्षय कुर्हाडे हा बर्याच दिवसांपासून पाठलाग करत होता. आरोपीने अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून तिचा विनयभंग करत कोणाला काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली होती. पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर, चाकण, रांजणगाव, तळेगाव या परिसरात ठिकाण बदलून राहत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली. यादव यांनी दोन स्वतंत्र पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना केली होती.
आरोपी वाहनावर क्लीनर म्हणून काम करत असताना लोणीकंद (जि.पुणे) येथून पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक शीतल मुगडे, अंमलदार तनवीर शेख, गणेश थोत्रे, योगेश भिंगारदिवे, अब्दुल कादर इनामदार, संदीप थोरात, अमोल गाढे, याकुब सय्यद, सोमनाथ राऊत, नितीन शिंदे, रिंकी मंढेकर, ज्योती काळे यांनी ही कारवाई केली.
हेही वाचा
Neeraj Chopra : नीरज चोप्राने झुरिच डायमंड लीगमध्ये दुसरे स्थान पटकावले
पुण्यातील गोल्ड बॉय रिलस्टारकडून सराईताने उकळली खंडणी; बदनामी करण्याची दिली धमकी