बीडच्या लोकांना गोदावरी खोऱ्यातून पाणी देणार : अजित पवार यांचे आश्वासन | महातंत्र

बीड, महातंत्र वृत्तसेवा : शेतकऱ्यांना आधार व मदत करण्याची भूमिका सरकारची आहे हे सांगण्यासाठी इथे आलो आहे. ऊसतोड मजूर कामगार मंडळ स्थापन केले. मजुरांच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करत आहोत. एक लाख कोटी लागले तरी चालेल, पण मला इथल्या लोकांना गोदावरी खोऱ्यातून पाणी द्यायचे आहे, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड येथील जाहिरे सभेत दिले आहे. या सभेत आमदार बाळासाहेब आजबे, माजी आमदार अमरसिंह पंडित, आमदार प्रकाश सोळंके, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासह स्थानिक नेत्यांनी आपले विचार मांडले.

अजित पवार म्हणाले,  बीड कष्टकऱ्यांची भूमी आहे. सरकारच्या माध्यमातून जनतेचे भले करायचे आहे. चढउतार राजकीय जीवनात येत असतात. आम्ही महापुरुषांचा आदर करणारे आहोत. महायुती सरकारमध्ये असलो तरी चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्व धर्मामध्ये जातीय सलोखा राखला गेला पाहिजे ही भूमिका आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोचल्या पाहिजेत. पीक विम्यासाठी बीड पॅटर्न काढला. तुमचे पैसे राज्य व केंद्र सरकार भरत आहे. एक रुपयाचा उतरवला आणि सरकारवर साडे चार हजार कोटी रुपये कर्ज झाले. मात्र, शेतकऱ्यांना लाभ मिळणे आवश्यक आहे. ही भूमिका सरकारने घेतली.

शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी किंवा समस्या तात्काळ सोडवल्या जातात, मात्र, विरोधक नेहमी चुकीचे सांगतात. सत्ता ही सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी असते. दोन लाख क्विंटल कांदा खरेदीचा निर्णय शेतक-यांसाठी घेतला. एवढ्या राज्यात वेगवेगळे प्रसंग येतात त्यातून मार्ग काढावा लागतो. आम्ही दिलेला शब्द पाळतो. मी शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलो आहे. शेतकरी ही माझी जात आहे. मराठवाडयातील पाण्याचा तुटवडा भरून काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जनतेचे प्रश्न, पाण्याचा प्रश्न, सहकार प्रश्न सोडवायचा असेल, लोकांनी दिलेला पैसा हा कष्टाचा व कराचा आहे तो चांगल्या कामासाठी खर्च झाला पाहिजे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार देशात आहे. त्यांचा करिष्मा आहे त्याचा उपयोग झाला पाहिजे म्हणून आम्ही निर्णय घेतला. आता आपल्याला मागे वळायचे नाही, असेही अजित पवार म्हणाले. लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना अशा एकत्र लढवायच्या आहेत. केंद्रात नरेंद्र मोदी यांचे तर राज्यात महायुतीचे सरकार आणायचे आहे, हेही पवार यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसने जो निर्णय घेतला. काही लोक म्हणतात फूट नाही तर आम्ही ही म्हणतोय फूट नाही. अजित पवार यांच्या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे. आयुष्यात कधीतरी निर्णय घ्यावा लागतो. तो सामुहिक निर्णय आम्ही घेतला, असेही प्रफुल पटेल म्हणाले.

बीडची ही अभूतपूर्व सभा झाली आहे. या सभेने राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रेम करणारे लोक आहेत हे सिद्ध झाले. त्यामुळे यापुढील निवडणूका घड्याळ चिन्हावर आपण लढणार आहोत, असे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे यांनी जाहीर केले.

धनंजय मुंडे म्हणाले, २०१४ ला कठीण परिस्थितीत अजित पवार यांनी विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी दिली. मी संघर्ष केला हे ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकात माझ्या दैवताने लिहिला आहे. हा माझा इतिहास आहे असेही आवर्जून धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले. १७ ऑगस्टच्या सभेत माझ्यावर टिका झाली. या जिल्ह्याला अजित पवारांनी भरभरुन दिले म्हणून ही उत्तरदायित्वाची सभा आहे. विकासाची, अस्मितेसाठी दुष्काळ कायम मिटविण्यासाठी ही सभा आहे, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. माझ्या पाचवीला संघर्ष पुजलेला आहे. मंत्री असूनही आज तुम्ही विश्वासाने कृषीमंत्री पदाची जबाबदारी दिली. ती जबाबदारी पार पाडण्याचे आश्वासन धनंजय मुंडे यांनी बीडमधील जनतेला दिले.

हेही वाचलंत का?

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *