मुंबई2 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाच्या मालकीचा हे ठरवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सोमवारी (२० नोव्हेंबर) सुनावणी झाली. त्यात शरद पवार गटाचे वकील अॅड. अभिषेक मनू सिंघवी यांनी अजित पवार गटाने ९०० शपथपत्रे दाखल केली. त्यातील अनेक खोटी असल्याचा आरोप केला. यापूर्वी ९ नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीत सिंघवी यांनीच असे म्हटले होते की, अजित पवार गटाने दाखल केलेल्या हजारो शपथपत्रांपैकी २० हजार खोटी आहेत. ११ दिवसांनंतर सिंघवींनी स्वत:च खोट्या शपथपत्रांचा आकडा सुमारे १९ हजारांनी घटवला.
शरद पवार, आमदार जितेंद्र आव्हाड, सुनील भुसारा यांच्या उपस्थितीत झालेल्या सुनावणीनंतर सिंघवी म्हणाले, अजित पवार गटाने ९०० शपथपत्रे निवडणूक आयोगात दाखल केली आहेत. त्यातील अनेक प्रतिज्ञापत्र खोटी आहेत. यामध्ये पदाधिकाऱ्यांच्या खोट्या प्रतिज्ञापत्रांचाही समावेश आहे. याप्रकरणी अजित पवार गटाविरोधात निवडणूक आयोगाने न्यायालयासमोर फौजदारी खटला चालवला पाहिजे. आम्ही अजित पवार गटाला आयोगासमोर उघडे पाडण्याचा प्रयत्न केला. तसेच दाखल प्रतिज्ञापत्रांपैकी एकही शरद पवारांविरोधातील नाही. त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल, असे सिंघवी म्हणाले.
सुनावणीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवारही उपस्थित होते. अजित पवार गटाकडून नीरज कौल आणि मणिंदरसिंग हे बाजू मांडत आहेत, तर शरद पवार गटाकडून अभिषेक मनू सिंघवी आणि देवदत्त कामत हे बाजू मांडत आहेत.
५० मि. उशिरा पोहोचल्याने सिंघवी यांची आयोगाकडून कानउघाडणी
दरम्यान, ५० मिनिटे उशिरा सुनावणीला पोहोचलेल्या सिंघवी यांची निवडणूक आयोगाने कानउघाडणी केल्याची माहिती समोर येत आहे. मागील सुनावणीत ज्या मुद्द्यांवर युक्तिवाद केला होता. त्याच म्हणजे प्रतिज्ञापत्रांच्या मुद्द्यांचा उल्लेख करू नका, असे आयोगाने त्यांना सुनावले. पुढील सुनावणी शुक्रवारी २४ नोव्हेंबरला होणार आहे.
Information Source / Image Credits