पुणे33 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
महिलांनी कुटुंबाच्या आरोग्याबरोबर स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. समर्थ युवा फाउंडेशनच्या वतीने आरोग्य शिबिरांचे आयोजन करणाऱ्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात पाटील मार्गदर्शन करीत होते. फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमीटेड (एमएनजीएल)चे संचालक संजय शर्मा, संचालिका भाग्यश्री मंथाळकर, सचीव श्रेया प्रभूदेसाई, राहूल पाखरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पाटील म्हणाले, महिला कुटुंबातील सर्वांच्या आरोग्याची काळजी घेतात. परंतु संकोचामुळे छोटे मोठे आजार अंगावर काढतात, वेळीच प्रतिबंधात्मक उपाय आणि तपासण्या केल्यास आजार बळावत नाही.कोरोनाच्या साथीनंतर आरोग्य सुविधांवरील मर्यादा लक्षात आल्या आहेत. त्यामुळे आजार होण्याआधीच त्यावर प्रतिबंधात्मक उपाय महत्त्वाचे आहेत. त्यासाठी वेळेवर आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे. असे मत पालकमंत्री, चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले.
राजेश पांडे म्हणाले, एमएनजीएलने पाच महिन्यांपूर्वी गरजू नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी मोबाईल मेडिकल व्हॅन उपलब्ध करून दिली होती. या व्हॅनच्या माध्यमातून 12 हजार नागरिकांची कर्करोग, मधुमेह, रक्त, कोलेस्टेरॉल अशा तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये मेमोग्राफी, स्तनांचा कॅन्सर, तोंडाचा कर्करोग अशा महागड्या तपासण्यांचा समावेश होता. राहूल पाखरे यांनी प्रास्वाविक, डॉ. संजय चाकणे यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.
मिरवणुकीत भाग घेणाऱ्या वाहनांच्या तपासणीसाठी स्वतंत्र सुविधा
प्रादेशिक परिवर्तन कार्यालय, पुणे कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद निमित्त मिरवणुकीत भाग घेणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर, ट्रेलर तसेच इतर हलक्या व जड वाहनांनी यांत्रिक तपासणी करुन घेणे आवश्यक असून १९ ते २७ सप्टेंबर या कालावधीत आरटीओ आळंदी रस्ता चाचणी मैदान (फुलेनगर) येथे व दिवे (ता. पुरंदर) चाचणी मैदान येथे स्वतंत्रपणे वाहन तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.मिरवणुकीदरम्यान सर्व संबंधितांनी वाहनाची सर्व कागदपत्रे व चालकाचे परवाने मुदतीत असल्याची खात्री करावी. चालकाने आपले वाहन चालविण्यासाठी दुसऱ्याच्या ताब्यात देऊ नये. वाहन एकाच ठिकाणी जास्त वेळ थांबणार असेल हॅन्डब्रेकचा तसेच उटीचा वापर करावा. वाहनाच्या इंधनाच्या टाकीचे झाकण हे धातूचेच असावे व ते घट्ट बंद करावे. वाहनचालकाच्या कॅबिनमध्ये कोणतीही सुटी वस्तु, ज्वलनशील पदार्थ ठेवू नये. चालकास वाहन चालविण्यास अडथळा होईल अशा प्रकारे कोणाही व्यक्तीस बसू देऊ नये तसेच वस्तूदेखील ठेवू नयेत. वाहन स्थिर स्थितीत असताना इंजिन बंद ठेवावे. हॉर्नचा अनावश्यक वापर टाळावा.