वर्धा, महातंत्र वृत्तसेवा : केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीमध्ये जिल्ह्यात ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये विविध उपक्रमाचे आयोजन करायचे आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने १७ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छतेसाठी श्रमदान मोहीम आयोजित करण्यात आली. यामध्ये शेकडो नागरिकांनी हातात झाडू घेऊन आपले गाव स्वच्छ सुंदर व आरोग्यदायी बनविण्यासाठी पुढाकार घेतला. या मोहिमेत लोकप्रतिनिधी, महिला, युवक, युवती तसेच अधिकारी व कर्मचारी यांनीही सहभाग घेतला.
महात्मा गांधीजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून केंद्र व राज्य शासन यांच्या निर्देशानुसार १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत’ स्वच्छता ही सेवा’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाची संकल्पना ‘कचरा मुक्त भारत’ अशी असून या अभियानामध्ये नागरिकांनी उस्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यात राबवायच्या श्रमदान मोहिमेमध्ये शेकडो नागरिक हातात झाडू घेऊन स्वच्छतेसाठी पुढे आले.
ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्यमान उंचाविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विविध अभियान तसेच उपक्रम राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी स्वच्छता ही सेवा हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात दृश्यमान स्वच्छता व सफाईमित्र कल्याण यावर लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये स्वच्छतेवर उपक्रम राबविणे, स्वयंस्फूर्तीने श्रमदान करून ग्रामीण भागातील सार्वजनिक ठिकाणे, बसस्थानके, रेल्वे स्थानके, पर्यटनस्थळे, उद्याने, अभयारण्य, ऐतिहासिक वास्तू वारसास्थळे, नदी किनारे, नाले, घाट आदी सार्वजनिक ठिकाणी ग्रामीण व शहरी भागामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्याच्या सूचना आहेत. शहरे व गावठाण परिसरातील विशेषतः बाजारपेठा, सार्वजनिक ठिकाणे, पर्यटन स्थळे आदी ठिकाणच्या भिंती रंगविणे व कचराकुंड्या ठेवावयाच्या आहेत.
जिल्ह्याची वाटचाल सद्यस्थितीत सर्व गावे मॉडेल करण्याकडे सुरू असून त्या दृष्टीने मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग सतत प्रयत्नरत आहे. मॉडेल व्हिलेजच्या दृष्टीने श्रमदान मोहिमेसारखे उपक्रम निश्चितच फायद्याचे ठरणार असल्याची प्रतिक्रिया अनेक ग्रामस्थांनी दिली.
१७ सप्टेंबरला राबवायच्या स्वच्छतेसाठी श्रमदान मोहिमेमध्ये जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीने सहभाग घेतला. या मोहिमेत शेकडो नागरिक सहभागी झाले होते.यामध्ये महिला, पुरुष, युवक युवती,लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.
-हेही वाचा