अमित ठाकरे दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर, नाशिकसह सिन्नरसह शहरातील गणेश मंडळाचे घेणार दर्शन 

नाशिक : आगामी निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच पक्षांनी पक्षबांधणी सुरु केली आहे. त्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यात जाऊन दौरे, सभा केल्या जात आहेत. सध्या गणेशोत्सवाचे दिवस असल्याने राजकीय नेत्यांची सार्वजनिक मंडळाच्या गणेश दर्शनासाठी गर्दी होऊ लागली आहे. अशातच मनसे देखील यात मागे नसून मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आले असून यात जवळपास 35 हून अधिक गणेश मंडळांना भेटी देणार आहेत. 

अमित ठाकरें दोन दिवसीय नाशिक दौरा

नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे मनसेने आता पुन्हा नाशिकवर लक्ष केंद्रित केले आहे. अमित ठाकरे सातत्याने नाशिक दौरे करत असून आता पुन्हा गणेशोत्सवाच्या निमित्ताने दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आले आहेत. यात ते नाशिक शहरातील 15 हून अधिक तर सिन्नर तालुक्यातील 19 हून अधिक गणेश मंडळांना भेटी देऊन गणपतीचे दर्शन घेणार आहेत. त्यामुळे गणेश दर्शनाच्या माध्यमातून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये अनेक राजकीय नेत्यांचे दौरे होत असून काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकांमुळे राजकीय दौऱ्यांना सुरुवात झाली आहे. यातून पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी, मतदारांशी अप्रत्यक्ष संवाद साधला जात आहे. युवा नेते अमित ठाकरे यांनी नाशिकमधील 35 बाप्पांच्या दर्शनाचा संकल्प करत गणेश मंडळांच्या माध्यमातून मतजोडणीचे नियोजन केले आहे.

Related News

अमित ठाकरेंकडून नाशिकमधील 35 बाप्पांच्या दर्शनाचा संकल्प

पुढील काही महिन्यात आगामी लोकसभा आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांनी नाशिकमध्ये दौरे वाढवले असून, आता गणेशदर्शनाच्या माध्यमातून भक्तांना ‘मनसे’कडे आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. अमित ठाकरे आज, मंगळवारपासून दोन नाशिक लोकसभा मतदारसंघातील 35 गणेश मंडळांना भेटी देऊन बाप्पांचे दर्शन घेत मतजोडणीची चाचपणी करणार आहेत. ओबीसी आरक्षण, तसेच प्रभागरचनेच्या घोळामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. या निवडणुकांपूर्वी आता लोकसभा निवडणूक होणार असून, त्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. तर राज ठाकरेंच्या पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण दौऱ्यानंतर ठाकरेंनी आता राज्यातील महत्त्वाच्या लोकसभांवर लक्ष केंद्रित केले असून, त्यात नाशिकचाही समावेश केला आहे. नाशिक लोकसभेची जबाबदारी राज ठाकरेंनी युवा नेते अमित ठाकरेंवर सोपवली आहे.

असा आहे एकूण दौरा 

दरम्यान अमित ठाकरे या दोन दिवसात नाशिकसह सिन्नरमधील प्रमुख गणेश मंडळ यांना भेट देऊन बाप्पांचे दर्शन घेणार आहेत. आज ते नाशिक शहरातून नाशिकरोड, अंबड गाव, इंदिरानगर, सिडको, गंगापूर रोड या भागातील 16 गणेश मंडळांना भेटी देणार आहेत. त्यानंतर बुधवारी सातपूर, मखमलाबाद, भगूर, देवळाली कॅम्प, पळसे, सिन्नर भागातील 19 गणेश मंडळांना भेटी देऊन बाप्पांचे दर्शन घेणार आहेत. ही सर्व गणेश मंडळे मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संबंधित असून, त्यांच्या भेटीद्वारे आगामी निवडणुकीची मतजोडणी केली जाणार असल्याने त्यांच्या दौऱ्याकडे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

इतर महत्वाची बातमी : 

 Amit Thackeray : एकदा राजसाहेब यांच्यावर विश्वास ठेवा, पुढच्या वर्षी संधी द्या, मग बघा; अमित ठाकरेंचे आवाहन 

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *