अमरावती, महातंत्र वृत्तसेवा : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला. पीडित मुलीला गर्भधारणा झाली. त्यानंतर तिचे संबंधितासोबतच लग्न लावून देण्यात आले. अलिकडे प्रसूती होऊन तिने बाळाला जन्म दिला. रुग्णालयात ती अल्पवयीन असल्याचे लक्षात आल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रविवार (दि.१७) आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून शुभम (२१) असे या आरोपीचे नाव आहे.
पीडित १५ वर्षीय मुलगी सावत्र आईजवळ राहते. सावत्र आईचा त्रास सहन होत नसल्याने ती एका जवळच्या नातेवाइकाकडे राहायला गेली. तेथे तिची ओळख शुभमसोबत झाली. या काळात शुभमने तिला लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर घरी कुणी नसल्याचे पाहून त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यातून तिला गर्भधारणा झाली. ही बाब त्याच्या कुटुंबीयांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी घाईगडबडीत शुभमसोबत तिचे लग्न लावून दिले. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी सासूने तिला एका रुग्णालयात दाखल केले. तेथे तिची प्रसूती झाली. मात्र, ती अल्पवयीन असल्याचे लक्षात आल्याने रुग्णालय प्रशासनाने गाडगेनगर पोलिसांना याबाबत माहिती दिली.
पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास केला. या घटनेतील पीडीत अल्पवयीन मुलीने दिलेल्या माहितीनंतर, पोलिसांनी आरोपी शुभमविरुद्ध बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा :