अमरावती8 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल आज, सोमवारी घोषित झाला. त्यानुसार दहावीच्या परीक्षेत ४३.३७ तर बारावीच्या परीक्षेत ३२.०२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ३ ऑगस्ट रोजी दहावी आणि बारावीचा शेवटचा पेपर घेण्यात आला होता. त्यामुळे अवघ्या २५ दिवसांत निकाल घोषित करुन शिक्षण मंडळाने नवा विक्रम नोंदविला आहे.
अमरावती मंडळाचा कसा लागला निकाल?
दहावीच्या परीक्षेसाठी अमरावती मंडळातून २ हजार ६८७ विद्यार्थ्यांनी पुरवणी परीक्षेचे अर्ज दाखल केले होते. त्यापैकी २ हजार ५२७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून १ हजार ८३ (४३.३७ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दरम्यान २ हजार ४३७ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली असून त्यापैकी केवळ ७९२ (३२.०२ टक्के) विद्यार्थी विविध श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. २० जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा घेण्यात आली होती. याच दरम्यान काही भागांत अतिवृष्टी व सततचा पाऊस असे वातावरण होते. त्यामुळे २० व २८ जुलैचा पेपर अनुक्रमे २ व ३ ऑगस्टला घेण्यात आला. त्यानंतर तातडीने तपासणीचे काम पूर्ण करुन आज, २८ ऑगस्ट रोजी निकाल जाहीर करण्यात आला.
31 ऑगस्टपर्यंत पदवी प्रवेश सुरू राहणार
दरम्यान निकाल जाहीर झाल्यामुळे दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावीत तर बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवीच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेणे शक्य झाले आहे. सध्या दोन्ही वर्गांच्या प्रवेश प्रक्रिया सुरु आहेत. अकरावीच्या पाच हजारांवर जागा रिक्त असून दहावी उत्तीर्ण झालेल्यांना त्या वर्गात प्रवेश घेता येणार आहे. तर दुसरीकडे पदवीची प्रवेश प्रक्रियासुद्धा ३१ ऑगस्टपर्यंत सुरु असल्याने बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही प्रवेश घेणे शक्य आहे. त्यामुळे दोन्ही परीक्षांमधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला असून म. रा. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद दिले आहेत.