अमरावती5 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
राठीनगर स्थित सरस्वती कॉलनी येथील श्री.श्री. रुक्मिणी आध्यात्मिक संस्कार केंद्रातर्फे (इस्कॉन) ३१ ऑगस्ट श्री बलराम जयंतीपासून ते ६ सप्टेंबर या कालावधीत भागवत कथामृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आयोजित या सात दिवसीय भागवत कथामृताची मांडणी त्रीदंड संन्यासी परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज यांचे वरिष्ठ शिष्य सुप्रसिद्ध कथा व्यास आणि इस्कॉनचे विभागीय पर्यवेक्षक श्रीमान अनंतशेष प्रभुजी करतील.
या कथेसोबतच श्रीधाम बरसाना येथील श्रीमान मुरारी शरण प्रभुजी यांच्याद्वारे विधिवत श्रीमद् भागवताच्या १८ श्लोकांचे पठणसुद्धा होणार आहे. त्यासोबतच लहानग्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी “कला महोत्सव जन्माष्टमी २०२३” या कला महोत्सवाची सुरुवातसुद्धा श्री बलराम जयंतीदिनी केली जाईल. त्यानुसार प्रत्येक दिवशी एका विषयावर ५ ते १० आणि ११ ते १४ या वयोगटाच्या मुला-मुलींसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
३१ ऑगस्ट रोजी रांगोळी स्पर्धा, १ सप्टेंबर रोजी रसराज स्पर्धा, २ सप्टेंबर रोजी चित्ररंग स्पर्धा, ३ सप्टेंबर रोजी हस्तकला स्पर्धा, ४ सप्टेंबर रोजी हरिकथा अनंत स्पर्धा, ५ सप्टेंबर रोजी गीत गोविंद स्पर्धा, ६ सप्टेंबर रोजी गोपाल शृंगार स्पर्धा आणि ७ सप्टेंबर रोजी कृष्णवेश स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेकरिता इस्कॉनमधील अनेक भक्त माताजींचा सहभाग राहणार आहे. इस्कॉनतर्फे वेळोवेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमांचा उद्देश जनमानसात आणि समाजात अध्यात्मिक ज्ञानाचा प्रचार-प्रसार करणे हा असतो. दरम्यान या संपूर्ण महोत्सवाच्या यशस्वितेकरिता इस्कॉन भक्तवृंद दिवस-रात्र सेवा करीत आहेत. या संपूर्ण कार्यक्रमाला अमरावतीकरांनी उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन इस्कॉन अमरावतीचे अध्यक्ष श्रीमान अद्वैताचार्य प्रभू यांनी केले आहे.