जत : सोने फसवणूक प्रकरणात मेहबूबवर आणखी एक गुन्हा नोंद; दीड लाखांना गंडा घातल्याची तक्रार | महातंत्र
जत; महातंत्र वृत्तसेवा : स्वस्तात सोने देतो म्हणून आणखी एकाची १ लाख ४८ हजार रुपयाची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. गेल्या महिन्याभरातील फसवणूक झालेली ही तिसरी घटना आहे. याबाबत आबासाहेब ज्ञानोबा वाघमोडे (रा. जनावर बाजार, सातारा रोड) यांनी जत पोलिसात फिर्याद दिली आहे. फसवणूक केल्याप्रकरणी मेहबूब रमजान शेख (रा. एमआयडीसी ता.जत) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ही फसवणूक ८ आक्टोंबर २०२३ रोजी झाली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सोने फसवणूक प्रकरणातील या तिसऱ्या या घटनेने खळबळ उडाली आहे. या सर्व घटनांनंतर आता फसवणूक झालेल्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जत तालुक्यात स्वस्तात सोने देतो म्हणून मेहबूब रमजान शेख (जातगार) यांनी आतापर्यंत तीन जणांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. कस्टमचे सोने असल्याने टॅक्स वाचतो. त्यामुळे कमी दराने सोने मिळते. असे सांगून अनेक जणांना फसवण्यात आल्याची माहिती समोर आले आहे. यात वैद्यकीय, राजकीय, सामाजिक, क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींची फसवणूक झाली आहे. परंतू सहसा कोणी फिर्याद देण्यास धजावत नाही. मेहबूब शेख यांनी वाघमोडे यांच्याकडून स्वस्तात सोने देतो म्हणून १ लाख ४८हजार रुपये घेतले होते. परंतु सांगितल्याप्रमाणे सोने आणि पैसे परत दिले नाहीत. यानंतर वाघमोडे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

सोने फसवणूक प्रकरणाचा सुत्रधार मेहबूब शेखवरील गुन्ह्यांमध्ये वाढ

सोने प्रकरणात २६ लाखांची फसवणूक प्रकरण उघडकीस आले. यातील मुख्य सूत्रधार मेहबूब शेख याला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी अशा प्रकारची फसवणूक झाल्यास जत पोलिसाची संपर्क साधण्याचे आवाहन केले होते. याला अनुसरून गेल्या आठवड्यात रेवनाळ येथील एका महिलेने जत पोलिसात मेहबूब शेख यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आज (दि. २१) हा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. मेहबूब यांनी केलेल्या फसवणुकीत आणखी किती बळी जाणार आहेत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबर करीत आहेत.

फसवणुकीची महिन्यातील तिसरी घटना : आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता

२ नोव्हेंबर रोजी स्वस्तात सोने देतो म्हणून एका आंध्र प्रदेशातील व्यापाऱ्याची साडे सव्वीस लाखाची फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी पाच जणावर गुन्हे दाखल झाले होते यावेळी पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी अशी फसवणूक झालेल्यांनी पोलीस ठाण्याची संपर्क साधण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर एका महिलेने मेहबूब शेख यांनी ९ लाखाची फसवणूक केल्याची तक्रार दिली आहे. त्यानंतर वाघमोडे यांनीही दीड लाखाची फसवणूक झाल्याची फिर्याद दिली आहे. अश्या आणखी घटना तालुक्यात घडलेल्या आहेत याची चर्चा शहरात सुरू आहे.

हेही वाचा

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *