कृषी विद्यापीठ व कृषी विभागाने एकत्र काम केल्यास रब्बी हंगाम: कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार यांचे प्रतिपादन

अहमदनगर3 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

यंदा जून महिन्यापासून आज अखेरीस पाऊसमान कमी असून आगामी दिवसात पावसाची शाश्वती राहिलेली नाही. धरण क्षेत्रातही पावसाचे प्रमाण कमी पाहता भविष्याकरिता पिण्यासाठी पाणी राखीव ठेवावे लागेल. या पार्श्वभूमीवर कृषी विद्यापीठ व कृषी विभागाने समन्वय साधून काम केल्यास अगामी रब्बी हंगाम यशस्वी होईल, असे प्रतिपादन राज्याचे कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार यांनी केले.

रब्बी हंगाम नियोजन बैठक

राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ व कृषी विभागाच्या समन्वयाने रब्बी हंगाम नियोजन २०२३-२४ या आढावा बैठकीत ते शनिवारी बोलत होते. या कार्यक्रमास महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील, कृषी विभागाचे विस्तार व प्रशिक्षण संचालक दिलीप झेंडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. चिदानंद पाटील, अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, विद्यापीठाचे नियंत्रक सदाशिव पाटील, कुलसचिव डॉ. विठ्ठल शिर्के, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, कृषी विभागाचे अधिकारी, विद्यापीठाचे सर्व सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ, कार्यक्षेत्रातील विविध पीक विशेषज्ञ, प्रकल्पांचे प्रमुख उपस्थित होते.

अनुप कुमार म्हणाले, रब्बी हंगामा बरोबरच राज्यात सर्वात जास्त दुग्धोत्पादन होणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यात जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन देखील महत्वाचे आहे. कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील म्हणाले, कृषी विद्यापीठाने स्थापनेपासून आजपर्यंत २८६ विविध पिकांचे वाण, १७७४ शिफारशी व ४४ कृषी यंत्रे शेतकऱ्यांसाठी प्रसारित करून कमी मनुष्यबळ असतानाही विद्यापीठ संशोधन, शिक्षण व विस्तार कार्यामध्ये प्रभावी पद्धतीने काम करत आहे.

यावेळी रब्बी हंगाम पूर्वनियोजन, रब्बी हंगामासाठी बियाणाची उपलब्धता, रब्बी ज्वारी खालील क्षेत्र वाढवण्यासाठीच्या उपाययोजना, मका पिकाखालील क्षेत्रात वाढ करणे व मुरघास तयार करण्यासाठी योग्य वाण, नाचणी व तत्सम पौष्टिक तृणधान्य पिकांचे पर्यायी रब्बी पीक पद्धतीसाठी वाव यावर कृषी विद्यापीठ व कृषी विभागाच्या तज्ञांनी सादरीकरण केले. सूत्रसंचालन संशोधन उपसंचालक डॉ. बाळासाहेब पाटील तर आभार सहयोगी संशोधन संचालक डॉ. राजेंद्र वाघ यांनी मानले.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *