शेतीमुळे मराठा समाजाचे नुकसान झाले: अर्जुन खोतकर यांचा दावा, म्हणाले – समाज वेळेनुसार बदलला नाही

कृष्णा तिडके | जालना17 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

जालना जिल्ह्यात मराठा आंदोलक आणि सरकार यांच्यातील चर्चा पुढे नेण्याचे काम माजी मंत्री अर्जुन खोतकर करत आहेत. त्यांनी मुख्यमंत्री आणि मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद ठेवत, आंदोलन शांत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्र्यांचे निरोप आंदोलकांपर्यंत ते पोहोचवत आहेत. तसेच आंदोलकांचे म्हणणे सरकार दरबारी मांडत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर दिव्य मराठीचे रिपोर्टर कृष्णा तिडके यांनी त्यांच्याशी केलेली बातचीत पाहूयात…

प्रश्न : आज सकाळी तुम्ही मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आणि राज्य सरकारचा निरोप त्यांना दिला. तर नेमकी काय चर्चा झाली, आणि काय निरोप होता?

अर्जुन खोतकर : कालच मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. काल त्यांनी राज्याचे अधिवक्ता आणि सर्व सचिवांची या विषयावर बैठक घेतली. या बैठकीत झालेल्या चर्चेअंती मराठा आरक्षणासाठी थोडा अवधी लागेल, असे मत तयार झाले आहे. त्यामुळे त्यांनी एक महिन्याची मुदत वाढून मागितली आहे. तेच मी मनोज जरांगे यांना सांगण्यासाठी गेलो होतो. आणि राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री महोदयांचा मान ठेवून एक महिन्याचा अवधी दिला पाहिजे, हे मनोज जरांगे यांना सांगण्यासाठी गेलो होतो. त्यासाठी मी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण देखील दिले आहे. शिवाजी महाराज चार पावले मागे जायचे आणि नंतर 25 पावले पुढे जात होते. आपल्या राजाचा तो आदर्श आपल्यासमोर आहे. आणि त्याप्रमाणे आपण मुख्यमंत्री महोदयांना वेळ द्यावा, असे मला वाटते.

प्रश्न : मनोज जरांगे पाटील यांची भूमिका तुम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना कळवली का? आणि यामध्ये तुमची काय भूमिका होती?

अर्जुन खोतकर : या संदर्भात मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे. एक महिन्याचा कालावधी आपण मागत आहोत तर एका महिन्यात जीआर निघाला पाहिजे, असे मी त्यांना सांगितले आहे. त्यासाठी ते पूर्ण प्रयत्नशील आहेत.

प्रश्न : तुम्हाला वाटते का एक महिन्यात जीआर निघेल?

अर्जुन खोतकर : ते प्रयत्नशील आहेत. शासन प्रयत्नशील आहे.

प्रश्न : आज सरकारचे शिष्टमंडळ येणार आहे का? आणि ते काय आश्वासन देणार आहे? काही लेखी घेऊन येणार आहे का?

अर्जुन खोतकर : हो, आज दुपारी साडेतीन वाजता शिष्टमंडळ येणार आहे. मुख्यमंत्री महोदय यांचा निरोप ते घेऊन येतील. तसेच माझ्याकडे असल्यापेक्षा जास्तीची माहिती त्यांच्याकडे असेल, तिथे ते मनोज जरांगे पाटील यांना देतील.

प्रश्न : तुम्ही सुरुवातीपासून जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे साक्षीदार आहात. आता हे आंदोलन कशाप्रकारे सुटेल, आंदोलनाबाबत तुम्हाला काय वाटते?

अर्जुन खोतकर : निश्चितपणे हे आंदोलन सुटले पाहिजे असे मला वाटते. तसेच न्याय देखील मिळाला पाहिजे. यापुढेही शांतता न बिघडता यावर तोडगा निघायला हवा, अशी माझी भूमिका आहे.

प्रश्न : मनोज जरांगे यांच्या प्रकृती बद्दल तुमचे डॉक्टरांशी बोलणे झाले का? त्यांची प्रकृती कशी आहे?

अर्जुन खोतकर : जरांगे यांच्या प्रकृतीबाबत मी स्वतः डॉक्टरला तेथे घेऊन गेलो होतो. डॉक्टरांना मी माझ्या समोर चेक करायला लावले. त्यांचा बीपी थोडा कमी झाला आहे. त्यांना थोडे पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

प्रश्न : जरांगे यांनी सुरुवातीला डॉक्टरांना चेक करायला नकार दिला होता?

अर्जुन खोतकर : मी स्वतः डॉक्टरला त्या ठिकाणी घेऊन गेलो होतो. माझ्यासमोर डॉक्टरांनी चेक केले. त्यांचा बीपी कमी झाला आहे. त्यांना डॉक्टरांनी पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे.

प्रश्न : मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे का? मराठा समाज आर्थिक दुर्बल आहे का? या सर्वाबाबत आपला अभ्यास काय सांगतो?

अर्जुन खोतकर : या संदर्भात माझे स्पष्ट मत आहे. मराठा समाज वेळे नुसार बदलला नाही. आणि वेळेनुसार बदलला नाही म्हणूनच मराठा समाज आज या अवस्थेला पोहोचला आहे. मराठा समाजाला आपण कुणबी समाज म्हणतो. हा पूर्णतः शेतीवर निर्भर आहे. कदाचित माझे बोलणे तुम्हाला पटणार नाही, किंवा माझा रागही येईल. मात्र, मराठा समाजातील, कुणबी समाजातील प्रत्येक माणूस एका घरात दहा लोक असतील किंवा 20 लोक असतील तर ते सर्व लोक शेतीच्या नादी लागले. आणि मराठा समाजाच्या सर्वात जास्त नुकसान कोणी केले असेल तर ते शेतीने केले आहे. एक तर हा समाज शेतीच्या नादी लागल्याने शिक्षण नाही त्यामुळे नोकरी नाही.
केवळ शेतीच्या नादी लागल्यामुळे त्यांना शिक्षण मिळाले नाही, नोकरी मिळाली नाही, व्यवसायामध्ये वाटा घेता आला नाही किंवा त्या दृष्टीने प्रगती झाली नाही. त्यामुळे आज शेतीमुळे या सर्व मराठा समाजाचे नुकसान झाले आहे.

या संदर्भात मी आपली माफी मागतो मात्र, हे वास्तव आहे. फक्त शेतीमुळे समाजाचे नुकसान झाले आहे. आधी त्यांना 10 एकर, 20 एकर, 25 एकर शेती होती. मात्र, आता परिवार मोठा झाला आहे. त्यामुळे केवळ दहा गुंठे शेती शिल्लक राहिली आहे. शेतीचे तुकडे झाले आहेत. त्यामुळे तो दारिद्र रेषेत जाणार नाही तर काय होणार? आज गुंठेवारीवर जमीन आली आहे. त्यामुळे मराठा समाज हा पूर्णतः आर्थिक दुर्बल घटकांमध्ये जाऊन बसला आहे. हलकीच्या परिस्थितीचे जीवन जगत आहे. याही बाबीचा विचार झाला पाहिजे.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *