‘वर्ल्डकप आपणच जिंकणार ना’, चाहत्याचा प्रश्न ऐकताच रोहित शर्माने दिलं उत्तर, VIDEO व्हायरल

वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा विजयरथ कायम असून सर्वच्या सर्व 7 सामन्यात जबरदस्त खेळी केली आहे. श्रीलंकेचा पराभव करत भारतीय संघाने आपल्या सलग सातव्या विजयाची नोंद केली. एकही पराभव न झालेला भारत हा एकमेव संघ आहे. श्रीलंकेचा पराभव करत भारतीय संघाने सेमी-फायनलमधील आपलं स्थान निश्चित केलं आहे. दरम्यान भारतीय संघ आता दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे. रविवारी कोलकात्यामधील ईडन गार्डन्स येथे हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी शनिवारी भारतीय संघ मुंबईतून रवाना झाला. 

भारतीय संघ विमानतळावर पोहोचला असता चाहत्यांनी त्यांना पाहण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी एका चाहत्याने रोहित शर्माला ‘वर्ल्डकप आपलाच आहे ना’ अशी विचारणा केली. त्यावर रोहितने हसत अजून वेळ आहे असं उत्तर दिलं. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

हार्दिक पांड्या संघाबाहेर

सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. याचं कारण अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडला आहे. बांगलादेशविरोधातील सामन्यात जखमी झालेला हार्दिंक पांड्या दुखापतीमधून सावरला नसल्याने अखेर त्याला संघाबाहेर बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. हार्दिक पांड्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला संघात जागा देण्यात आली आहे. नॅशनल क्रिकेट अकॅडमीत हार्दिक पांड्याची चाचणी घेतली असता अद्यापही तो दुखापतीमधून सावरला नसल्याचं समोर आलं. 

चाचणीत नेमकं काय झालं?

हार्दिक पांड्याला नेटमध्ये संपूर्ण ताकदीने गोलंदाजी करण्यास सांगण्यात आलं. यावेळी त्याला धीम्या गतीने तुझा वेग वाढवण्यास सांगण्यात आलं होतं. हार्दिक पांड्या दुखापतीमधून सावरत असल्याने त्याने पायावर जास्त जोर द्यावा अशी कर्मचाऱ्यांची इच्छा नव्हती. पहिल्या तीन चेंडूंवर हार्दिक पांड्याला कोणतीही समस्या जाणवली नाही. यानंत त्याने पुढील चेंडूवर तीव्रता वाढवण्याचं ठरवलं. चौथ्या चेंडूवर हार्दिक पांड्याला पायात वेदना जाणवू लागल्या. 

पांड्याने सपोर्ट स्टाफला उजव्या पायाच्या घोट्यात वेदना होत असल्याचं सांगितलं. त्याने 80 टक्के तीव्रतेने पाचवा चेंडू टाकला असता वेदना आणखी वाढल्या. यानंतर नॅशनल क्रिकेट अकॅडमीच्या वैद्यकीय पथकाने पुन्हा एकदा स्कॅन करण्याचं ठरवलं. “स्कॅन केला असता त्याच्या हाडाला अद्यापही सूज असून, अजून काही आठवडे लागणार असल्याचं स्पष्ट झालं. यानंतर बीसीसीआयने संघ व्यवस्थापन आणि निवड समितीला बदली खेळाडूची निवड करण्यास सांगितलं,” अशी माहिती बीसीसीआय अधिकाऱ्याने दिली आहे.

शनिवारी सकाळी आयसीसीने हार्दिक पांड्या आता वर्ल्डकप खेळू शकणार नाही आणि त्याच्या जागी भारतीय बोर्डाने प्रसिद्ध कृष्णाला संधी दिली असल्याची माहिती दिली.

पांड्याची भावनिक पोस्ट

दरम्यान वर्ल्डकप संघातून बाहेर पडल्यानंतर हार्दिक पांड्याने एक्सवर पोस्ट शेअर करत आपल्या भावना मांडल्या आहेत. मी आता वर्ल्डकप स्पर्धेचा भाग नाही ही गोष्ट पचवणं फार जड आहे असं हार्दिकने म्हटलं आहे. तसंच हा संघ विशेष असून सर्वांनाच अभिमान वाटेल अशी कामगिरी करेल असा विश्वास व्यक्त केला आहे. 

हार्दिकने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “मी आता उर्वरित वर्ल्डकपचा भाग नसेन ही गोष्ट पचवणं थोडं जड आहे. पण मी प्रत्येक चेंडूवर संघासाठी चिअऱ करत असेन. तुमच्या शुभेच्छा, प्रेम आणि पाठिंब्यासाठी आभार. हा संघ विशेष असून सर्वांनाच अभिमान वाटेल अशी कामगिरी करेल”.Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *