मुंबईएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
इंडिया आघाडीची बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर असे दोन दिवस ही बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून बुधवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी मोदी सरकार पराभूत होणारच, असा विश्वास काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. तसेच इंडियाचा विजय कसा होणार याचे समीकरणही त्यांनी स्पष्ट केले.
अशोक चव्हाण म्हणाले की, इंडिया आघाडीत आज जे पक्ष आहेत, त्यांना 2019 च्या निवडणूकीत एकूण 23 कोटी 40 लाख मते मिळाले होती. तर भाजपला 22 कोटी मते मिळाली होती. त्यावेळी महाविकास आघाडी नसल्याचा फायदा भाजपचा झाला. त्यामुळे त्या निवडणुकीत त्यांचा विजय झाला. त्यावेळी सर्व विरोधक स्वतंत्र लढले होते. शिवाय भाजपने जिथे सरकारे पाडली ते सोडून 11 मुख्यमंत्री या आघाडीत आहेत. कर्नाटकमध्ये त्यांनी काँग्रेस पक्ष फोडला तरी तेथे आमचेच सरकार आले आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले.
अशोक चव्हाण म्हणाले की, आमचा केवळ विरोध करायचा अजेंडा नाही. विकासाचे काम करण्यासाठी आणि लोकशाहीसाठी आम्ही एकत्र आलो आहोत. ‘इंडिया’ ला मिळथ असलेल्या प्रतिसादावरून महाराष्ट्रातही महाविकास आघाडीचेसरकार येईल, असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला. इंडिया आघाडीत 26 पक्ष होते. मात्र आता या आघाडीत 28 पक्ष एकत्र आले आहेत. सर्व पक्ष एकत्रितपणे देशभरात भाजपविरोधात लढणार आहेत, त्यामुळे भाजपचा पराभव निश्चित आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणार
माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले की, जसे आपण आपल्या बहिनीचे रक्षण करतो तसेच देशाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. आम्ही सर्व पक्षाचे लोक या बैठकीसाठी तयारी करत आहोत. इंडिया आघाडीत आता 28 राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. शाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा टीकवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, आम्ही ही विचारधारा पुढे घेऊन जाणार आहोत. असे मतही माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.