Asia Cup 2023 : पाकसाठी पहिला पेपर सोपा | महातंत्र

मुलतान, वृत्तसंस्था : ज्या क्षणाची सर्वजण वाट पाहत आहेत तो क्षण आता जवळ आला आहे. आशिया चषक स्पर्धा सुरू होण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. 2018 नंतर प्रथमच ही स्पर्धा एकदिवसीय फॉरमॅटमध्ये खेळवली जात आहे. आशिया चषक (Asia Cup 2023) स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर खेळवली जात आहे, ज्यामध्ये पाकिस्तान चार सामन्यांचे यजमानपद भूषवणार आहे, तर श्रीलंका अंतिम सामन्यासह एकूण नऊ सामने आयोजित करेल. स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात मुलतान येथे खेळवला जाणार आहे. 2 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून भारतीय संघ आपल्या अभियानाची सुरुवात करेल.

पाक संघावर दुहेरी दबाव

आशिया चषकातील सलामीचा सामना यजमान पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात मुलतान येथे खेळवला जाईल. ही लढत एकतर्फी होण्याची शक्यता कमी आहे. कारण, एक संघ आयसीसी वन-डे क्रमवारीत प्रथम क्रमांकावर आहे, तर दुसरा संघ प्रथमच एवढ्या मोठ्या स्पर्धेत खेळणार आहे. त्यांच्या संघाचे नेतृत्व रोहित पुडेल करत आहे. नेपाळचा संघ कमकुवत मानला जात असला, तरी युवा खेळाडूंच्या जोरावर पुढे जाण्याची ताकद या संघात आहे. नेपाळकडे मोठ्या संघाविरुद्ध खेळण्याचा फारसा अनुभव नाही. त्यामुळे त्यांच्याकडे गमावण्यासारखे काहीही नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पाकचा संघ विजय मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करेल यात शंका नाही; पण त्याचवेळी त्यांच्यावर दुहेरी दबाव असेल. कारण, ते त्यांच्याच भूमीवर खेळणार आहेत आणि त्यांना नवख्या संघाविरुद्ध अतिआत्मविश्वासाने खेळणे टाळावे लागेल.

…तर नेपाळसाठी मोठा मानसिक विजय (Asia Cup 2023)

पाकिस्तानची धुरा बाबर आझमच्या हातात असेल. पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात कसलीच स्पर्धा नसेल, असे चित्र आहे; कारण एकीकडे विक्रमवीर फलंदाजांची फळी आणि तुफानी वेगवान गोलंदाजांचा ताफा आहे, तर दुसरीकडे युवा खेळाडूंची फौज आहे. जर या सामन्यात पाकिस्तानला जिंकण्यासाठी मेहनत घ्यावी लागली, तर तो नेपाळसाठी मोठा मानसिक विजय असेल. नेपाळचा संघ आधीच पाकिस्तानात पोहोचला असून, तयारीला अंतिम रूप दिले आहे. मात्र, मैदानावर दोन्ही संघ आमने-सामने कधी येतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मुलतानचे हवामान :

आशिया चषक स्पर्धेचा सलामीचा सामना मुलतान क्रिकेट स्टेडियमवर रंगणार असून, सामन्याच्या दिवशी खेळाडूंना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागू शकतो. 32 ते 43 अंश सेल्सिअस तापमान असण्याचा अंदाज आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.

मुलतानचा इतिहास :

मुलतान क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत 10 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. 10 सामन्यांपैकी प्रथम फलंदाजी करणार्‍या संघाने 5 आणि धावांचा पाठलाग करणार्‍या संघाने 5 सामने जिंकले आहेत. स्टेडियमवर एकदिवसीय क्रिकेटमधील आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या 3 बाद 323 आहे, जी पाकिस्तानने बांगला देशविरुद्ध खेळताना केली होती.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *