नवी दिल्ली11 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
भारतीय ऑलिम्पिक संघटनेने आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी जाणाऱ्या जिम्नॅस्टिक संघातून ऑलिम्पियन दीपा कर्माकरचे नाव वगळले आहे. गेल्या काही वर्षांपासून दीपाने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला आहे.
Related News
पुढील महिन्यात चीनमध्ये या स्पर्धा होणार आहेत. दिव्य मराठीने या विषयावर राष्ट्रकुल आणि विश्वचषक पदक विजेती दीपा कर्माकर आणि तिचे प्रशिक्षक यांच्याशी चर्चा केली. दीपाने सांगितले की, चाचणीमध्ये ती पहिल्या क्रमांकावर होती. पण प्रशिक्षक म्हणाले, निवड करताना सध्याचा फॉर्म नाही तर 2 वर्षे जुना विक्रम पाहिला.
दीपाने दोन गोष्टी सांगितल्या…
1. साईचा निकष काय? हे माहिती नाही
दीपा म्हणाली की, ‘मी ऐकले आहे की माझे नाव पाठवले नाही. साईचे काही निकष आहेत, त्यामुळे मला पाठवले नाही. त्यांचे निकष काय आहेत हे मला माहिती नाही. बघूया पुढे काय होते. सध्या मी माझे प्रशिक्षण सुरू ठेवत आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून दुखापतीमुळे मी काही स्पर्धा खेळू शकले नाही. या कारणामुळे साईने माझे नाव वगळल्याचे सांगितले जात आहे, मात्र साईने फुटबॉल टीमही पाठवली आहे.
2. फुटबॉल संघ पाठवला, मला का नाही?
ती म्हणाली, “आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठवलेल्या फुटबॉल संघाची कामगिरीही विशेष नाही. मी कोणावरही टीका करत नाही, पण फुटबॉल संघ पाठवता येत असेल तर मला का नाही. काही दिवसांपूर्वी माझी चाचणी झाली होती. मी पहिल्या स्थानावर होते. बघूया काय होते ते. मला माहिती आहे की माझ्या तयारीवर परिणाम होत आहे, पण मी सराव करणे थांबवले नाही.”

प्रशिक्षक म्हणाले- निवड सध्याच्या फॉर्मवर आधारित
दीपाचे प्रशिक्षक बीएस नंदी म्हणाले, “ज्या लोकांनी निकष लावले आहेत, त्यांनी ते अत्यंत चुकीचे केले आहे. आम्ही टेक्निकल लोक आहोत, आमच्या महासंघात अनेक तांत्रिक तज्ज्ञ आहेत. त्यांनी महासंघ आणि तज्ज्ञांना काहीही विचारले नाही आणि हे निकष लावले.
जिम्नॅस्टिक हा मुख्यतः तांत्रिक खेळ आहे, त्यात 80% विज्ञान आहे. हे निकष लावणारे कोण आहेत हे मला माहिती नाही. मी 1971 पासून या खेळाशी निगडीत आहे. सहसा या खेळात खेळाडूची सध्याची कामगिरी पाहिली जाते जुने रेकॉर्ड नाही.
हे लोक 2 वर्षांची कामगिरी बघून अतिशय चुकीची निवड करत आहेत. हे अतिशय धोकादायक आहे आणि त्यामुळे भारतीय जिम्नॅस्टिक्सचे नुकसान होईल. मला विश्वास आहे की सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या मुलांना जुलै-ऑगस्टमध्ये भुवनेश्वर येथे होणाऱ्या चाचण्यांसाठी पाठवले पाहिजे.
गेल्या महिन्याच्या चाचणीत दीपा अव्वल
11-12 जुलै रोजी भुवनेश्वर येथे भारतीय जिम्नॅस्टिक संघाच्या चाचण्या झाल्या, त्यामध्ये दीपा कर्माकर अव्वल ठरली. महासंघाने पुरुष आणि महिला गटात अव्वल 10 खेळाडूंची नावे साईकडे पाठवली होती, मात्र भारतीय ऑलिम्पिक संघटनेने दीपा कर्माकरचे नाव कापले, दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या प्रगतीची संघात निवड करण्यात आली आहे.
जिम्नॅस्टिक्स फेडरेशनचे अध्यक्ष म्हणाले – आम्ही विचारणा केली आहे
भारतीय जिम्नॅस्टिक्स फेडरेशनचे अध्यक्ष सुधीर मित्तल म्हणाले, “फेडरेशनने दीपाचे नाव चाचण्यांमध्ये अव्वल राहिल्यानंतरच पाठवले आहे. जर भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनला स्वत:च नावे पाठवायची असतील तर फेडरेशनला नावे मागितलीच कशाला.
अशा परिस्थितीत महासंघाच्या चाचणीचा फायदाच काय ? आम्ही साई आणि ऑलिम्पिक असोसिएशनला विचारले आहे की, आम्ही चाचणीच्या आधारावर नाव पाठवले होते, मग दिपाचे नाव का कापले गेले?