अहमदनगर2 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
भारतीय राज्यघटना गोरगरीब व आदिवासींची कवच कुंडली आहे. मात्र, काही लोक जाती-धर्माच्या नावावर राजकारण करून मतभेद निर्माण करत आहे. मणिपूरमध्ये आदिवासी महिलांवर झालेला अत्याचार हा देशाला कलंक आहे. लोकशाही व राज्यघटना वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र झाले पाहिजे, असे आवाहन करत आमदार बाळासाहेब थोरात यांनी आदिवासींच्या विकासासाठी सातत्याने काम केल्याची माहिती माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिली.
पारंपारिक वेशभूषा, नृत्य व घोषणांच्या निनादात हजारो आदिवासी समाजाचा भव्य जनजागृती मेळावा व रॅली बुधवारी झाली. मालपाणी लॉन्स येथे आयोजित जनजागृती मेळाव्यात डॉ. तांबे बोलत होते. माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे, डॉ. जयश्री थोरात, प्रा. बाबा खरात, काशिनाथ गोंदे, नामदेव पारधी, हिरालाल पगडाल, शांताबाई खैरे, स्वाती मोरे, दशरथ गायकवाड, सुधाकर जोशी, संतोष हासे, दशरथ वर्पे, श्रीराम कुऱ्हे, वैशाली साबळे उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बस स्थानक ते यशोधन कार्यालय दरम्यान रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत आदिवासी नृत्य सादर करून नागरिकांची मने जिंकली. क्रांती दिनानिमित्त काँग्रेसने सकाळी प्रभात फेरी काढली.
आमदार बाळासाहेब थोरात यांनी दूरध्वनी वरून आदिवासी बांधवांना गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या. थोरात म्हणाले, आदिवासी संस्कृतीला मोठी परंपरा आहे. हा समाज प्रामाणिक व कष्टाळू आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी समाजाचे मोठे योगदान राहिले आहे. आदिवासींनी शिक्षणातून प्रगती साधावी, असा सल्ला दिला. दुर्गा तांबे म्हणाल्या, आदिवासी रानपाखरं आहेत. पाने, फुले व निसर्गाशी त्यांचे नाते आहे. शेतीचा शोध आदिवासी महिलेने लावला. मणिपूरमध्ये आदिवासी महिलांवर झालेले अत्याचार काळीमा फासणारे आहे. मणिपूर सरकार बरखास्त करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. डॉ. थोरात म्हणाल्या, आदिवासींच्या विविध प्रश्नांसाठी आमदार बाळासाहेब थोरात सातत्याने पाठपुरावा करत आहे. विधानसभेत त्यांनी आवाज उठवला. कोळवाडे येथे आश्रमशाळा व एसएमबीटी हॉस्पिटल सुरू केले. आदिवासी समाज कष्टकरी असल्याने त्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी. मुलींचे शिक्षण करून व्यसनापासून दूर राहावे, असे आवाहन केले. प्रास्ताविक प्रा. बाबा खरात यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. मुख्याध्यापक दशरथ वर्पे यांनी आभार मानले.