गुडाळ; महातंत्र वृत्तसेवा : मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय पुढार्यांना गावबंदीची राधानगरी तालुक्यातील खिंडी व्हरवडे या गावात आज (दि. २९) सायंकाळी सकल मराठा समाजाच्या वतीने कॅन्डल मार्च काढण्यात आला. या कॅन्डल मार्चमध्ये गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुणी आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जारंगे -पाटील यांना पाठिंबा आणि समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने गावातून कॅन्डल मार्च चे आयोजन करण्यात आले होते . ग्रामपंचायत चौकातील मनोज जरांगे-पाटील यांच्या पाठिंब्याच्या फलकापासून या मोर्चाला सुरुवात झाली.मनोज जरांगे -पाटील आगे बढो, आरक्षण आमच्या हक्काचं – नाही कुणाच्या बापाचं, कोण म्हणतंय आरक्षण देत नाही- घेतल्याशिवाय राहत नाही अशी प्रचंड घोषणाबाजी कॅन्डल मार्च मध्ये करण्यात आली. गावातून फेरी काढत हा कॅन्डल मार्च हनुमान मंदिर परिसरात विसर्जित करण्यात आला.
यावेळी सरपंच निवेदिता गुरव,माजी सरपंच सपना पाटील,कल्पना पाटील, सुनिता पाटील, पी जी पाटील, डॉ. बाजीराव खांडेकर, रमेश पाटील यांची भाषणे झाली. मराठा आरक्षण संदर्भात गावातील आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी या सभेत सर्वानुमते पंचवीस जणांची एक समिती निवडण्यात आली आहे.
19 नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या भोगावती साखर कारखान्याच्या निवडणुकीसह भविष्यातील कोणत्याही निवडणुकीत मराठा आरक्षण मिळेपर्यंत गावात प्रचार सभांना बंदी घालण्याचा निर्णय ग्रामस्थांनी एकमताने घेतला आहे.