BAN vs SL : श्रीलंकेचा विजयी प्रारंभ | महातंत्र

पाल्लेकेले, वृत्तसंस्था : ‘आशिया कप 2023’ मधील दुसर्‍या सामन्यात यजमान श्रीलंकेने बांगला देशचा 5 विकेटस् राखून पराभव केला. श्रीलंकेचा हा स्पर्धेतील पहिला विजय आहे. 4 विकेट घेणार्‍या मथिशा पथिराणा याला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला.

प्रथम फलंदाजी करणार्‍या बांगला देशला श्रीलंकेने पथिराणा, तिक्षणाच्या गोलंदाजीच्या जोरावर 164 धावात रोखले होते. त्यानंतर सदिरा समरविक्रमा (54) आणि चरिथ असलंका (नाबाद 62 धावा) यांनी चौथ्या विकेटसाठी 78 धावांची भागीदारी रचली. याच्या जोरावर श्रीलंकेने 66 चेंडू शिल्लक ठेवून सामना जिंकला.

बांगला देशी आव्हानाचा पाठलाग करताना लंकेची सुरुवात खराब झाली. त्यांना तस्किन अहमदने तिसर्‍या षटकात पहिला धक्का दिला. सलामीवीर दिमुथ करुणारत्नेला अवघ्या 1 धावेवर माघारी परतला. त्यानंतर शोरिफुल इस्लामने दुसरा सलामीवीर पथुन निसंकाला 14 धावांवर माघारी धाडले. अनुभवी कुसल मेंडीसदेखील 5 धावांची भर घालून माघारी परतला. त्याला कर्णधार शाकिब अल हसनने बाद केले. यावेळी लंकेची अवस्था 3 बाद 43 धावा अशी झाली होती.

मात्र, यानंतर सदिरा समरविक्रमा आणि चरिथ असलंका यांनी डाव सावरत चौथ्या विकेटसाठी सावध भागीदारी रचली. या दोघांनी 78 धावांची भागीदारी रचत लंकेला शंभरी पार करून दिली. मात्र, अर्धशतक ठोकणारा समरविक्रमा 54 धावा करून बाद झाला. त्यानंतर असलंकाने दासुन शानकासोबत लंकेला विजय मिळवून दिला. असलंकाने नाबाद 62 धावांची खेळी केली. तर शानकाने नाबाद 14 धावा केल्या. श्रीलंकेने बांगला देशविरुद्ध विजय मिळवला खरा; मात्र त्यांना 165 धावा करण्यासाठी 39 षटके खेळावी लागली.

तत्पूर्वी, बांगला देशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दुसर्‍याच षटकात तिक्षणाने पदार्पणवीर तांझिद हसनला भोपळ्यावर पायचीत केले. 8 व्या षटकात गोलंदाजीला आलेल्या धनंजया डी सिल्व्हाला फटका मारण्याच्या प्रयत्नात मोहम्मद नईम (16) झेलबाद झाला.

पथिराणाने बांगला देशला तिसरा धक्का देताना शाकिब अल हसनला (5) बाद केले. तोवहिद हृदय (20) आणि नजमुल शांतो यांनी बांगला देशची पडझड थांबवत 39 धावांची भागीदारी केली. नजमुल व मुश्फिकर रहिम चांगला खेळ करत होते. परंतु,

पथिराणाला पुन्हा गोलंदाजीला बोलविण्याचा श्रीलंकेला फायदा झाला. रहिम (13) विकेट देऊन बसला. त्यानंतर बांगला देशचा संघ 164 धावांत तंबूत परतला. नजमुल होसैन शांतो 122 चेंडूंत 7 चौकारांच्या मदतीने 89 धावांवर बाद झाला.

The post BAN vs SL : श्रीलंकेचा विजयी प्रारंभ appeared first on महातंत्र.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *