यवतमाळ; महातंत्र वृत्तसेवा : यवतमाळ तसेच राळेगाव परिसरातून चार दुचाकी चोरुन लोहारा भागातील घनदाट जंगलामध्ये खड्डा खोदून त्यात गाड्या लपविणाऱ्या भामट्याला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई राळेगाव पोलिस पथकाने केली.
संतोष नामदेव वाघमारे (रा. झाकीर हुसेन कॉलनी वर्धा) याने २ नोव्हेंबरला राळेगाव पोलिस ठाण्यात आपली दुचाकी चोरीस गेल्याची फिर्याद दिली. ३१ ऑक्टोबर रोजी विश्रामगृह परिसरात दुचाकी उभी केली असता ती चोरट्याने चोरुन नेल्याचे फिर्यादीत म्हटले होते. या प्रकरणी राळेगाव ठाण्यात वाहन चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान लोहारा परिसरात चोरीस गेलेल्या वर्णनाप्रमाणे मोटारसायकल घेऊन एकजण संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने तत्काळ जाऊन त्याला ताब्यात घेतले. सुमित निरंजन भगत (३०) रा. नांझा, ता. कळंब ह.मु. पिवळी नदीजवळ नागपूर असे या भामट्याचे नाव आहे. त्याच्याकडून एक लाख रुपये किमतीची दुचाकी जप्त करण्यात आली. पथकाने पोलिसी खाक्या दाखविताच सुमित भगत याने राळेगाव व यवतमाळ परिसरातून आणखी चार दुचाकी चोरल्याची आणि त्या लोहारा परिसरातील जंगलात एका खड्यामध्ये पुरल्याचे सांगितले. पोलिसांनी चारही दुचाकी ताब्यात घेतल्या. ही कारवाई पोलिस निरीक्षक रामकृष्ण जाधव, पोलिस अंमलदार गोपाल वास्टर, सुरज चिव्हाणे, सुरज गावंडे, विशाल कोवे आदींनी केली.