परभणी, महातंत्र वृत्तसेवा : घरात एकटी असलेल्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका भोंदूबाबास येथील प्रथमवर्ग न्यायाधीश श्रीमती एस.एम. हुरगट यांनी एक वर्षाच्या सश्रम कारावासाची व एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. शेख फरीदसाब शेख नन्हू (वय 68, रा.सिनगी ता.अहमदपूर) असे या भोंदूबाबाचे नाव आहे.
शहराच्या कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक महिला घरी एकटी असताना शेख फरीदसाब या भोंदूबाबाने घरात प्रवेश करीत आपण महादेवाचे भक्त असून तिच्या घरातील वातावरण व पैसा कसा सुरक्षित राहिल, याबद्दल प्रसाद देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे ती महिला विश्वासाने त्याच्याजवळ बसली असता या भोंदूबाबाने तिच्याकडे मागणी करीत विनयभंग केला. त्यावेळी तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.
याच दरम्यान पीडित महिलेचा पती आल्याचे पाहून हा भोंदूबाबा पळून गेला. या संदर्भात पीडितेच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. फौजदार सुप्रिया केंद्रे यांनी गुन्ह्याचा तपास करीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे 3 साक्षीदार तपासण्यात आले. पीडितेची साक्ष महत्वाची ठरल्याने भोंदूबाबा शेख फरीद याने विनयभंग केल्याचे साक्षी पुराव्यावरून सिद्ध झाल्याने न्यायाधीश एस.एम.हुरगट यांनी त्यास दोषी ठरवून एक वर्ष सश्रम कारावास व एक हजार रूपये दंड. दंड न भरल्यास साधा कारावास तसेच कलम 354 नुसार एक वर्ष सश्रम कारावास व एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अॅड. डी. बी. गिते यांनी बाजू मांडली.
हेही वाचा