भाजपचा आप सरकारवर हजारो कोटींचा गैरव्यवहाराचा आरोप | महातंत्र








नवी दिल्ली, महातंत्र वृत्तसेवा : दिल्ली सरकारच्या जल मंडळात विविध मार्गांनी एकूण ३,७५३ कोटी रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचा खळबळजनक आणि गंभीर आरोप भाजपने केला आहे. यासोबतच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जिथे हात लावतात तिथे गैरव्यवहार होतो असा टोला भाजपने लगावला आहे.

आज भाजप मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रिय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी केजरीवाल सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या. दिल्लीतील पाणी निविदा आणि इतर विविध प्रक्रियेत अनियमितता आढळून आली असल्याचे त्या म्हणाल्या. केजरीवाल सरकारव्दारे ६०० करोड किमतीच्या १२ हजार कामाच्या आदेश देण्यात आल्या मात्र या कामात निविदा प्रक्रिया वगळण्यासाठी पायाभूत किंमत ५ लाखापेक्षा कमी ठेवली आणि केजरीवालांनी आपल्या जवळच्या लोकांना निविदा दिल्याचा भाजपने आरोप केला आहे. करोडो रूपये आप सरकारने बुडित खात्यात दाखवले आहेत ज्यांचा हिशोबच नाही.  दिल्ली जल मंडळाच्या आर्थिक नोंदीमध्ये १६६  कोटी रुपयांची तफावत आढळून आल्याचा दावा केला आहे. हा पैसा बँक खात्यात जमा केल्याचे आप सरकारकडून सांगितले गेले पण, दिल्ली जल बोर्डचे खाते आणि बँक खात्याचा ताळमेळ जुळत नसल्याचा दावा मीनाक्षी लेखी यांनी केला.

दिल्लीत ग्राहकांची संख्या वाढली,  मीटर वाढले पण महसूल कमी झाला. जल मंडळात आलेला हा पैसा गेला कुठे असा प्रश्न मीनाक्षी लेखी यांनी केजरीवाल सरकारवर डागला आहे. ज्या भागात पाण्याच्या पाईपलाईन टाकल्या नाहीत अशा ठिकाणी टँकरने पाणी पुरवले जाते त्यासाठी हजारो रूपये आकारले जात असल्याचा दावा त्यांनी केला. “टँकर माफिया”च्या तावडीतून आजही दिल्ली मुक्त झाली नसून याचा भूर्दंड सामान्य जनतेला सहन करावा लागत आहे. शीला दीक्षित सरकारच्या काळात दिल्लीला टँकर माफियापासून मुक्त करण्याची भाषा करणारे केजरीवालांनीच टँकर माफियांना अजून सशक्त केल्याचा आरोप मीनाषी लेखी यांनी केला.

दिवाळी धमाका सेल प्रमाणे आम आदमी पक्षाने सर्व भ्रष्ट लोकांना हवे तिथे लुटण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.  मुख्यमंत्री आवास गैरव्यवहार प्रकरणाचा दाखला देत ज्या गतीने आप सरकार गैरव्यवहार करत आहे त्यांचा कोणी हात धरू शकत नसल्याचे मीनाक्षी लेखी यांनी म्हटले.









Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *