2024च्या आधी भाजप फुटणार!: संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, एनडीए अस्तित्वाच नाही, ती केवळ एक नौटंकी

मुंबई40 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

2024च्या आधी भाजप हा फुटलेला पक्ष असेल. भाजप फुटणार, असा मोठा दावा आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.

Related News

शिवसेना नसेल तर एनडीए शून्य

आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए ही नौटंकी आहे. इंडिया आघाडी निर्माण झाल्यानंतर भाजपला एनडीएची आठवण झाली. तोपर्यंत एनडीए दिसतही नव्हते. तसेही एनडीएमध्ये इकडून तिकडून लोकं घेतले आहेत. शिवसेना आणि अकाली दल नसेल तर एनडीए शून्य आहे. एनडीएची ताकद शिवसेना आणि अकाली दल होती. बाकीचे लोक येतात जातात. सध्या एनडीए अस्तित्वातच नाही. आताची एनडीए म्हणजे एक नौटंकी आहे. त्यामुळे एनडीए राहील की नाही माहीत नाही. 2024मध्ये भाजपही फुटलेला पक्ष असेल, याची मला खात्री आहे.

आता मोदींची जादू संपली

पूर्वी मोदी है तो मुमकीन है. मोदी काफी है, अशा घोषणा भाजप कार्यकर्ते देत होते. मात्र, आमच्या इंडिया आघाडीनंतर त्यांनाही एनडीएची आठवण झाली आहे. थोडक्यात अकेला मोदी काफी है, असे चित्र सध्या नाही. इंडिया निर्माण झाल्यावर मोदी अकेला नही चलेगा, ही जाग भाजपला आली. त्यामुळे त्यांनी इथूनतिथून लोक जमा केले. आताची एनडीए ही कमकुवत आहे. आता एआयडीएमके पक्ष एनडीएतून बाहेर पडला आहे. अजून काही लोक भाजपमधून बाहेर पडतील. एवढेच नव्हे तर भाजपही फुटेल.

मुनंगटीवार यांचा ठाकरेंना टोला

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सध्या शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण सुरू आहे. यावरुन सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर अनेक तांत्रिक प्रश्न निर्माण झाले असते. मात्र, हे ईश्वर हे कल्याणच करतो. त्यामुळेच आपल्याला ईश्वराचे अस्तित्व मान्य असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. त्यालाही संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले.

भाजपचेच अकल्याण होईल, राऊतांचे प्रत्युत्तर

संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी नैतिकतेवर राजीनामा दिला आहे. भाजपमध्ये नितिमत्ता असेल तर 16 आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेतील. माझे आमदार जातात, त्यामुळे मी विधीमंडळात बहुमत का सिद्ध करू? माझ्याच लोकांच्या विरोधात आणि सत्तेसाठी मी आटापिटा का करू? असे उद्धव ठाकरे यांना वाटले. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. ही नैतिकता ठाकरेंकडे होती. 2024 साली त्यांचे आणि त्यांच्या पक्षाचे अकल्याण झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा शब्द आहे.

त्यांना किंमत मोजावी लागेल

दरम्यान, आमदार अपात्रतता सुनावणी प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर संजय राऊत आणि अंबादास दानवे दबाव टाकत आहे, असा आरोप भाजप आमदार नीतेश राणे यांनी केला आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले, विधानसभा अध्यक्षांवर आम्ही दबाव टाकत नाही. सर्वोच्च न्यायालयाचा दबाव आहे. कोर्टाच्या निर्णयावरच आम्ही बोलत आहोत. राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे. वकिलीची सनद घेताना घटनेची शपथ घेतली आहे. वर्षभरात त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात घटनेचा आणि कायद्याचा खून होताना दिसत आहे. त्यांना काही वाटत नसेल तर विधीमंडळाच्या काळ्याकुट्ट इतिहासातील पान त्यांच्या नावावर लिहिलं जाईल. ते बेकायदेशीर सरकार चालवायला समर्थन देत आहेत. याचे चिंतन त्यांनी केले पाहिजे. जनतेत रोष आहे. त्याची किंमत सर्वांना मोजावी लागेल. या कटात जे आहेत त्यांना किंमत मोजावी लागेल, असा इशाराही राऊतांनी दिला.

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *