सट्टा बाजारात कोट्यवधींची उलाढाल; भारताच्या पराभवाने बुकी मालामाल | महातंत्र

स्वप्निल पाटील

सांगली :  विश्वचषक स्पर्धेत सलग दहा सामने जिंकत विजयाची घोडदौड कायम ठेवल्यामुळे विश्वचषक भारत जिंकेल, असे गृहित धरून सट्टा बाजारात भारताच्या बाजूने 45 टक्के आणि ऑस्ट्रेलियाच्या बाजूने 55 टक्के सट्टा लागला होता, पण ऑस्ट्रेलियाने विश्वचषक जिंकल्याने सट्टा बाजारात मोठी उलाढाल झाली. बुकी मालामाल, तर अनेक सट्टेबाज भिकेकंगाल झाले.

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन तुल्यबळ संघात विश्वचषकाचा अंतिम सामना होता. त्यामुळे शनिवारी सायंकाळपासूनच सट्टा बाजारात तेजी होती. भारताचा विश्वचषकातील खेळ पाहता, अनेकांनी भारताच्या बाजूने सट्टा लावलेला. सट्टा बाजारात देखील सुरुवातीला तशीच परिस्थिती होती. सट्टा बाजारात भारताच्या बाजूने एक रुपयासाठी दीड रुपया आणि ऑस्ट्रेलियाच्या बाजूने एक रुपयासाठी अडीच रुपयांचा सट्टा लागला होता. म्हणजे भारताचा विजय झाल्यास 50 पैसे अधिक आणि ऑस्ट्रेलियाचा विजय झाल्यानंतर दीड रुपया अधिक मिळणार होता.

सट्टा बाजारातदेखील भारताची पैसेवारी कमी असल्याने, अनेकांनी भारत जिंकेल या समजुतीतून सुरुवातीला जोरदार सट्टा लावला होता. भारताने फलंदाजी घेतल्यानंतर 80 टक्के सट्टा भारताच्या बाजूने आणि 20 टक्के सट्टा ऑस्ट्रेलियाच्या बाजूने होता.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतल्याने अनेकांनी ऑस्ट्रेलियाच्या बाजूने सट्टा लावला होता. सामन्याच्या सुरुवातीला भारताच्या फलंदाजांनी जोरदार फलंदाजी सुरू केल्याने बुकींमध्ये चलबिचल सुरू झालेली. भारताची फलंदाजी कोसळताच सट्टा बाजार तेजीत आला. एकूण सट्टा लावलेल्यांमध्ये 45 टक्के लोकांना या अंतिम सामन्याचा फटका बसला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या विजयामुळे सट्टा बुकी मालामाल आणि सट्टाबाज मात्र भिकेकंगाल झाले.

बुकींची कोणाशी मिलीभगत?

सांगली, मिरजेतील नामांकित बुकी आयपीएल, विश्वचषकात सट्टा घेतात, हे सर्वश्रुत आहे. त्यांची ठिकाणे देखील
पोलिसांना माहिती आहेत. तरी देखील बुकींवर कारवाई होत नसल्याचे दिसून येते. मग या बुकींची नेमकी कोणाशी मिलीभगत? त्यांच्यावर कारवाई का होत नाही? असा देखील प्रश्न आता उपस्थित होत आहे.

सांगली, मिरजेतून महाराष्ट्राचा सट्टा

सांगली आणि मिरज शहरात काही प्रसिद्ध बुकी आहेत. ते संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकातून सट्टा घेत होते. भारताचा पराभव झाल्याने नामांकित बुकींनी एका सामन्यात कोट्यवधींची माया जमविली आहे. भारताची पैसेवारी कमी दाखवून भारताकडे सट्टा वळविला होता आणि त्यामुळे बुकी यशस्वी देखील झाले.

वेगवेगळ्या अ‍ॅपवरून घेतला सट्टा

सांगली आणि मिरजेतील नामांकित सट्टा बुकींकडून वेगवेगळे अ‍ॅप तयार केले आहेत. अ‍ॅपद्वारे त्यांच्याकडून सट्टा घेतला होता. या अ‍ॅपवर सट्टा घेण्यासाठी एजंटांची देखील नेमणूक केली होती. यासाठी मिरज सेंटर केले होते.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *